Latest Marathi News
Ganesh J GIF

शिवरायांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादाचा शेवट गोड

माढा तालुक्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला असून चौथ्या दिवशी गाव तणावमुक्त झालं आहे. पुतळा बसवण्यावरून निर्माण झालेला संघर्ष टाळण्यायासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत मोहोळ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री झालेल्या दोन्ही समाजाच्या नेत्यांची बैठक पार पडली.

फुलारी यांच्या समवेत अंजनगाव येथील धनगर समाज व मराठा समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याबाबत दोन्ही समाजाचे एकमत झालं असून आता या पुतळ्याचं स्थलांतर केलं जाणार आहे. यासाठी दोन्ही समाजाचे प्रतिनिधी मिळून नवी जागा शोधणार असल्याची माहिती भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांनी मध्यरात्री दिली.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, शिवरायांच्या पुतळ्यावरून संघर्ष निर्माण झाल्यानंतर राज्यस्तरावर या मुद्द्याची प्रचंड चर्चा झाली होती. त्यामुळे प्रशासन आणि स्थानिक राजकारण्यांकडून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु होते. शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे , कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी सुनील फुलारे, नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि मराठा समाज प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वादावर यशस्वी तोडगा निघाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेली जागा देवस्थानाची असल्यामुळे ग्रामस्थ व मराठा समाज उद्या जी जागा पसंत करेल तिथे पुतळ्याचे स्थलांतर होणार, असं बैठकीत ठरलं आहे. शनिवारी जागेचा शोध घेतला जाणार असून अंजनगावात स्थलांतरित जागेवर पुतळा उभारणीच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री जयकुमार गोरे लगेच मंजूर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक ग्रामस्थांसोबत गावात फिरुन जागा निश्चित करतील. बैठकीसाठी सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी नुकताच जिल्हा अधिकारी पदाचा चार्ज घेतलेले कार्तिकेयन, माढा विभागाचे प्रांत अधिकारी जयश्री आव्हाड, माढ्याचे तहसीलदार संजय भोसले, मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, अंजनगावचे मंडल अधिकारी तलाठी आदी उपस्थित होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!