
नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत समोर आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाने आता अधिक भीषण वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीमुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे.

आरोपी हे केवळ काम करण्यासाठी नाही, तर त्यांचे ‘विशिष्ट मनसुबे’ पूर्ण करण्यासाठी सुटीनंतरही कंपनीत संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे.

एसआयटीला संशय आहे की, मुख्य आरोपींनी 2022 पासूनच कंपनीत कट्टरतेचे विचार रुजवण्यासाठी आणि विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी जाळे विणण्यास सुरुवात केली होती. केवळ कामाच्या नावाखाली कंपनीच्या मालमत्तेचा आणि वेळेचा वापर करून काही महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवले जात होते. तर आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी संशयित काम संपल्यावर घरी न जाता कंपनीत विशिष्ट हालचाली करायचे, अशी माहिती एका माजी कर्मचाऱ्याने एसआयटीला दिल्याची माहिती समोर येत आहे.

आता महिलांचे लैंगिक आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाची तपासणी वेगाने सुरू आहे. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती / संघटनांकडून फंडिंग होते का? याबाबतचा तपास एसआयटीकडून सुरू सुरु आहे. तर कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची देखील एसआयटीकडून चौकशी केली आहे. तसेच ई-मेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, धमक्या यांची देखील तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

