
मुंबईच्या दिंडोशी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आले आहे. उपचार आणि अध्यात्माच्या आडून महिलांचे शोषण करणाऱ्या आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या रिदम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ (वय 37) या भोंदू बाबाला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 60 हून अधिक पीडितांनी तक्रारी दाखल केल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिदम पांचाळ हा काही वर्षांपूर्वीपर्यंत एक सामान्य जिम ट्रेनर होता. मात्र, झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी त्याने भोंदू बाबा बनण्याचा मार्ग स्वीकारला. लोकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने मालाड परिसरात मोकळ्या मैदानात दर गुरुवार आणि शनिवार ‘दरबार’ भरवण्यास सुरुवात केली. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत चालणाऱ्या या दरबारात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत असे.

या भोंदू बाबाचा दावा होता की त्याच्यावर देवी अवतरते आणि तो कोणतेही आजार बरे करू शकतो. विशेषतः मूल न होणाऱ्या महिलांना तो लक्ष्य करत असे. उपचाराच्या नावाखाली तो महिलांना मध्यरात्री बोलावून घेत असे आणि पूजा व उपचाराच्या बहाण्याने त्यांच्यावर अश्लील कृत्य करत असल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हे, तर उपचारासाठी तो भक्तांकडून मोठ्या रकमा, महागडी दारू, सिगारेट, जिवंत कोंबड्या आणि बोकडाचे काळीज यांसारख्या विचित्र मागण्या करत असे. भूतबाधा काढण्याच्या नावाखाली तो सिगारेट पेटवून अंगातील भूत उतरवण्याचे नाटक करत असल्याचेही उघड झाले आहे.

