
अंबरनाथमध्ये भर रस्त्यात दारूच्या नशेत दोन तरुणांनी घातलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या तरुणांनी पोलिसांसोबत देखील गैरवर्तन केल्याचं उघडकीस आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी रात्री दोन तरुण दारू पिऊन रस्त्यावरच गोंधळ घालत होते.त्यांनी नागरिकांसोबत वाद घालत गैरवर्तन केले.ज्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली.

स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र,मद्यधुंद अवस्थेतील या तरुणांनी पोलिसांशीही हुज्जत घालत धक्काबुक्की केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.अखेर दोन्ही तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान,या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.


