
राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. एसटी महामंडळाने प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, आता प्रत्येक प्रवाशाला तिकीटाच्या दराव्यतिरिक्त जादा २ रुपये द्यावे लागणार आहेत.१५ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे.

एसटी महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता प्रत्येक बस तिकीटावर २ रुपये ‘स्वच्छता अधिभार निधी’ म्हणून आकारले जात आहेत. तुम्ही १० किलोमीटरचा प्रवास करा किंवा १०० किलोमीटरचा, प्रत्येक तिकीटामागे हे २ रुपये कायमस्वरूपी द्यावे लागणार आहेत. जरी ही रक्कम वैयक्तिक पातळीवर किरकोळ वाटत असली, तरी नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा कायमचा आर्थिक भार ठरणार आहे. परंतु त्या बदल्यात राज्यातील कोणत्याही एसटी बस स्थानकावरील स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी प्रवाशांना पैसे द्यावे लागणार नाहीत.

यापूर्वी प्रवाशांना स्थानकावरील प्रसाधनगृहे वापरण्यासाठी ५ ते १० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता तिकीटासोबतच ‘स्वच्छता अधिभार’ घेतला जात असल्याने ही सुविधा पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. तिकीटासोबतच ‘स्वच्छता अधिभार’ घेतला जात असल्याने ही सुविधा पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्थानकांवरील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने हा पाऊल उचलले आहे.

राज्यात दररोज सरासरी ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. या नव्या नियमामुळे महामंडळाच्या महसुलात मोठी वाढ होणार आहे. गणित मांडल्यास, या २ रुपयांच्या अधिभारातून दररोज जवळपास १ कोटी १० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जमा होणार आहे. महिन्याकाठी ही रक्कम ३० कोटींच्या घरात जाते. हा निधी प्रामुख्याने प्रवाशांच्या सोयीसुविधांवर वापरला जाणार आहे.

