Latest Marathi News
Ganesh J GIF

“आरोप करायला अक्कल लागत नाही…”; भाजप नेत्याचा मनोज जरांगेंवर घणाघात

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. “आरोप करायला फार अक्कल लागत नाही. ज्यांना सिस्टीमच समजून घ्यायची नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचे?” असा थेट सवाल दरेकरांनी केला आहे.

जात पडताळणी समितीचे काम नियमांनुसार

मराठ्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात महसूल मंत्र्यांचा हात असल्याच्या आरोपावर बोलताना दरेकर म्हणाले, “जात पडताळणी समितीला न्यायालयीन अधिकार असतात. त्यात कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाही. काही त्रुटी असतील म्हणून नोंदी रद्द झाल्या असतील. झोपलेल्याला जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही.”

माणसं तोडण्यापेक्षा जोडण्याचं काम करा

जरांगे यांनी दिलेल्या अल्टिमेटमवर उत्तर देताना दरेकर म्हणाले की, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे. जरांगे यांनी माणसं तोडण्यापेक्षा जोडण्याचे काम करावे. मराठा आणि ओबीसी वाद लावणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही.

“नाक्यावर बसणे अन् सिस्टीममध्ये काम करणे यात फरक”

आमदार पाडण्याच्या इशार्‍यावर बोलताना दरेकरांनी जरांगे यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. “जरांगे यांनी कुठल्यातरी मतदारसंघातून उभे राहावे. विधिमंडळात आल्यावर त्यांना सिस्टीम समजेल. रस्त्यावर-नाक्यावर बसून आंदोलन करणे आणि सिस्टीममध्ये राहून काम करणे यात खूप फरक असतो,” असे ते म्हणाले.

बावनकुळेंची प्रतिमा मलिन करणे योग्य नाही

कुठला मंत्री त्रास देतोय त्याचे नाव जरांगेंनी स्पष्ट करावे, असे सांगत दरेकरांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची बाजू घेतली. बावनकुळे हे सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे नेते असून त्यांची प्रतिमा मलिन करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!