Latest Marathi News
Ganesh J GIF

बळीराजावर उन्हाचा घाला! लातूरमध्ये उष्माघाताने पहिला मृत्यू; शरीरातील पाणी घटल्यानं झाला अनर्थ

लातूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, या भीषण उष्णतेने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची हृदयद्रावक घटना निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे घडली आहे.लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, उष्माघाताच्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोमवारी दुपारी लक्ष्मण भंडारे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्याचे तापमान 42 अंशांच्या पार गेले आहे. दुपारी कडाक्याच्या उन्हात काम करत असताना भंडारे हे अचानक जमिनीवर कोसळले. शेतात उपस्थित असलेल्या इतरांनी त्यांना तातडीने औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलवण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, निलंग्याला नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर कडाक्याच्या उन्हात काम केल्यामुळे लक्ष्मण भंडारे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली होती. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना उष्माघाताचा तीव्र झटका बसला, जो त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. मयत लक्ष्मण भंडारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून आणि नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान, भारतीय हवामान विभागाने देशातील हवामानाबाबत गंभीर इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एका बाजूला कडक उन्हाचा तडाखा असताना, दुसरीकडे काही राज्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.

सध्या देशातील अनेक भागांत तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचले आहे. महाराष्ट्रातील अकोला आणि वर्धा येथे तापमानाने 45 अंशांचा उच्चांक गाठला आहे. उत्तर भारतात पुढील काही दिवसांत तापमानात आणखी 3 ते 4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे 23 एप्रिलपर्यंत तापमान 44 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज असून, दिवसासोबतच रात्रीचे तापमानही अधिक राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
उष्णतेच्या लाटेसोबतच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी 30 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश येथेही अशाच प्रकारच्या हवामान बदलांचा अनुभव येऊ शकतो. या टोकाच्या हवामान बदलांमुळे झाडे उन्मळण्याची, वीजपुरवठा खंडित होण्याची आणि उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः फळबागांना गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!