
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. खरातच्या बेनामी संपत्तीचा आणि काळ्या पैशाचा छडा लावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने आता तपासाची चक्रे वेगवान केली आहेत. नाशिक आणि सिन्नरमधील खरातच्या बँक खात्यांची झडती घेतली असता, त्यात कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार उघड झाले असून ईडीने आता खरात आणि त्याच्या पत्नीच्या मागील १० वर्षांतील आर्थिक व्यवहारांचे विश्लेषण सुरू केले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने आपली ओळख लपवण्यासाठी आणि काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक बोगस खाती उघडली होती. सिन्नरमधील जगदंबा माता ग्रामीण पतसंस्थेत खरातने तब्बल ३२ बोगस खाती उघडल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. या बोगस खात्यांतून खरात आणि त्याच्या पत्नीच्या वैयक्तिक चार बँक खात्यांवर कोट्यवधी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

खरातच्या खात्यात मागील तीन वर्षांत जे कोट्यवधींचे व्यवहार झाले, त्याबद्दल त्याने पोलिसांना सांगितले की, “हे पैसे ईशान्येश्वर मंदिराला भक्तांनी दिलेले दान आहे.” मात्र, ईडीला यामध्ये ‘मनी लाँड्रिंग’चा दाट संशय आहे. या दानाच्या नावाखाली काळा पैसा फिरवला गेला का? याचा तपास करण्यासाठी ईडीने खरातच्या बँक खात्याशी संबंधित भक्तांची यादी ताब्यात घेतली असून त्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता खरातच्या बड्या भक्तांचे धाबे दणाणले आहेत.

ईडीने केवळ खरातच नाही, तर त्याच्या पत्नीच्या आणि मुलाच्या बँक खात्यांचीही कसून चौकशी केली आहे. मुलाच्या खात्यात अद्याप संशयास्पद काही आढळले नसले तरी, पत्नीच्या खात्यात झालेल्या ट्रॅन्झॅक्शनमुळे ती देखील चौकशीच्या फेऱ्यात आहे. मागील १० वर्षांत या कुटुंबाकडे एवढी मालमत्ता आणि रोख रक्कम कुठून आली? याचा शोध आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे घेतला जात आहे.

