Latest Marathi News
Ganesh J GIF

पवनराजे निंबाळकर मृत्यू प्रकरण ; पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल दोन दशकांनंतर (१८ वर्षे) या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली असून, संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईतील विशेष न्यायालयाकडे लागले आहे. माजी गृहमंत्री आणि माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींच्या भाग्याचा फैसला आता लवकरच होणार आहे.

काय आहे प्रकरण?

३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे भरदिवसा पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पवनराजे मुंबईहून धाराशिवकडे (तत्कालीन उस्मानाबाद) जात असताना दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

राजकीय वैरातून २५ लाखांची सुपारी?

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्यात तीव्र राजकीय शत्रुत्व होते. याच वैमनस्यातून डॉ. पाटील यांनी पवनराजेंचा काटा काढण्यासाठी तब्बल २५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप सीबीआयने केला आहे. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तपास केला, मात्र पवनराजेंच्या पत्नी आनंददेवी निंबाळकर यांच्या आक्षेपानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

बड्या आरोपींची फौज आणि दीर्घ लढा

या प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटील मुख्य आरोपी असून त्यांच्यासोबत खालील संशयितांवरही खटला सुरू आहे:

मोहन शुक्ला (नगरसेवक, मुंबई)

कैलास यादव (बसपा नेता, उत्तर प्रदेश)

शशीकांत कुलकर्णी (माजी उत्पादन शुल्क निरीक्षक)

सतीश मंदाडे (लातूर)

पारसमल जैन, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे (शूटर)

पद्मसिंह पाटील यांना २००९ मध्ये सीबीआयने अटक केली होती, मात्र २५ सप्टेंबर २००९ पासून ते जामिनावर बाहेर आहेत.

निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष

मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या खटल्यात न्यायालय कोणाला दोषी ठरवणार आणि कोणाला निर्दोष मुक्त करणार, यावर धाराशिवसह महाराष्ट्रातील अनेक राजकीय समीकरणे अवलंबून आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!