
अकोला तालुक्यातील निंभा गावात अंधश्रद्धेचे थरारक वास्तव उघड करणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, यात चिमुकल्याचा जीव धोक्यात घालून तथाकथित ‘बाबा’कडून अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार दिसून येत आहे; मात्र हा व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा असल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

निंभा गावात काही लोक अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लहान मुलांवर जीवघेणे प्रयोग करत असल्याची माहिती आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिमुकल्यावर अत्यंत धोकादायक आणि अघोरी पद्धतीने उपचार केले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या प्रकरणाची दखल घेत मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीधर जी. गुठ्ठे यांनी संबंधित व्यक्तींना १६ एप्रिल रोजी नोटीस बजावली. त्यामध्ये निंभा येथील ‘बैरम बुवा’ संस्थानात धार्मिक विधीच्या नावाखाली विविध कार्यक्रम आयोजित केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

या कार्यक्रमादरम्यान दैवी शक्ती, चमत्कार, अघोरी प्रथा किंवा भविष्य सांगण्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत अशा कृत्यांना मनाई असून, कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच संबंधितांना ठाणेदार गुठ्ठे यांच्यासमक्ष समज देण्यात आली.

