Latest Marathi News
Ganesh J GIF

फरार कल्पना खरातचा नवा ‘कारनामा’

भोंदूगिरी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अशोक खरात याचे आता उरणशीही संबंध असल्याचे समोर आले आहे. खरात तुरुंगात आणि त्याची पत्नी फरारी असताना, पत्नीच्या नावावर उरणमध्ये ५८ लाख ५० हजार रुपयांचा जमीन व्यवहार पार पडला आहे.या प्रक्रियेत महसूल आणि नोंदणी विभागाने दाखवलेल्या कमालीच्या तत्परतेमुळे आता भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होत आहेत.

उरण तालुक्यातील चाणजे गावातील सर्व्हे क्रमांक ३७१/३ ही जमीन अस्मिता अविनाश म्हात्रे आणि कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून कल्पना अशोक खरात हिच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. १२ मार्च २०२६ रोजी हे खरेदीखत नोंदवले गेले. धक्कादायक बाब म्हणजे, १७ मार्च २०२६ रोजी पोलिसांनी अशोक खरातला बेड्या ठोकल्या, त्याच दिवशी तलाठी सजा चाणजे यांनी या व्यवहाराची वर्दी नोटीस चावडीवर प्रसिद्ध केली.

सामान्य माणसाला सातबाऱ्यावर नाव चढवण्यासाठी वर्षानुवर्षे तहसील कचेरीचे उंबरठे झिजवावे लागतात. जमीन व्यवहारांमध्ये तलाठी, सर्कलची जागरूकता अतितीव्र असते. नियमांवर बोट ठेवून त्रुटी काढल्या जातात व वरकमाईचे निमित्त शोधले जाते. मात्र, या ‘हायप्रोफाइल’ गुन्हेगाराच्या प्रकरणात महसूल यंत्रणेने चक्रे अत्यंत वेगाने फिरवली. १३ एप्रिल २०२६ रोजी, म्हणजेच महिना पूर्ण होण्याआधीच फेरफार क्रमांक ८३५१ मंजूर करण्यात आला. आरोपीची पत्नी फरारी असताना तिची ओळख कशी पटवण्यात आली आणि इतक्या वेगात फेरफार कसा मंजूर झाला, असा प्रश्न आहे.

या संदर्भात संशय वाढल्यानंतर नायब तहसीलदार पेडवी यांनी स्पष्टीकरण दिले. ‘संबंधित फेरफार नोंद कार्यालयात आली होती; मात्र पुढील कार्यवाहीसाठी कोणीही न आल्याने ती रद्द करण्यात आली आहे.’ मूळ खरेदीखत अद्याप अस्तित्वात असल्याने भविष्यात ही नोंद पुन्हा जिवंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा व्यवहार नेमका कोणत्या स्थितीत आहे, याबाबत संभ्रम आहे. या प्रकरणातील दुय्यम निबंधक कार्यालय, तहसीलदार आणि तलाठी यांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. फरारी महिलेची ओळख पडताळणी कोणी केली, अटकेच्या दिवशीच नोटीस कशी प्रसिद्ध झाली, हा व्यवहार करण्यासाठी कोणाचा वरदहस्त होता, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!