Latest Marathi News
Ganesh J GIF

बिर्याणीनंतर कलिंगड खाणं बेतलं जीवावर; एकाच रात्री कुटुंबातील चौघांचा अंत

मुंबईतील पायधुनी इथं एकाच कुटुंबातील चार जणांचा रविवारी रात्री विषबाधेनं मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि दोन मुलींचा समावेश आहे. विषबाधा झालेल्या या चौघांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रविवारी पहाटे साडेपाच, सहा वाजताच्या सुमारास या चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. 25 एप्रिल रोजी या चौघांनी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नातेवाईकांसह एकत्र जेवण केलं होतं.

बिर्याणी खाऊन नातेवाईक आपल्या घरी परतले, त्यानंतर मध्यरात्री या चौघांनी कलिंगड खाल्लं. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा, झैनब अशी मृतांची नावं आहेत. डोकाडिया यांच्या घरात त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याविषयी नातेवाईकांनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला आहे.

अब्दुल्ला यांचा चुलत भाऊ मोहम्मद मुस्तफा इक्बाल यांनी सांगितलं की, सर्व पाहुण्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली होती. परंतु याच कुटुंबाने कलिंगड खाल्ला होता. त्यामुळे कलिंगडमधूनच विषबाधा झाल्याचा आम्हाला संशय आहे.

पोलिसांकडून आता सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप संशयास्पद काही सापडलं नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कलिंगड विक्रेत्याच्या चौकशीतदेखील अद्याप काही संशयास्पद सापडलं नसल्याची पोलिसांची माहिती आहे. पायधुनीच्या घाटी गल्लीत जिथे ही दुर्दैवी घटना घडली, तिथे अद्याप कलिंगड खाऊन विषबाधा झाल्याचा इतर कोणताही प्रकार समोर आला नाही.

याप्रकरणी पोलिसांनी व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी पाठवला असून त्याच्या अहवालात सगळं स्पष्ट होईल, असं सांगण्यात येतंय. डोकाडिया कुटुंबीयांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच इमारतीत चौथ्या मजल्यावर राहत असलेल्या डॉ. कुरेश यांना बोलावलं. त्यांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून चौघांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!