
भोर तालुक्यात वाढत्या उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असून, ७ गावे व एका वाडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. त्यापैकी चार गावांना लोकसंख्येनुसार भोर पंचायत समितीकडून आजपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने भोर तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाई गंभीर बनली आहे. महामार्गालगत असलेल्या शिंदेवाडी, ससेवाडी, साळवडे आणि करंदी खेबा या गावांनी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मान्यता देत संबंधित गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, रायरी परिसरातील धाराबेवाडी, परहर, वारवंड, शिळीम, शिरवली आणि हिमाची माळवाडी या गावांनीही टँकर मागणीचे प्रस्ताव सादर केले असून, ते तहसीलदारांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.करंदी खेबा येथील विहिरीत पाणी कमी पडत असल्याने पुरंदर तालुक्याच्या हद्दीतून पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याची योजना होती. मात्र, ही पाइपलाइन वनविभागाच्या हद्दीतून जाणार असल्यामुळे अद्याप परवानगी मिळालेली नाही आणि त्यामुळे हे काम रखडले आहे. तसेच भोर-महाड मार्गावरील नीरा-देवघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील विहीर कोरडी पडली आहे. परिणामी वारवंड गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तेथे टँकरची मागणी करण्यात आली आहे. सध्या काही गावांमध्ये ग्रामस्थांना खासगी टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

याशिवाय, ‘जलजीवन मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या अनेक पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. निधीअभावी काही कामे रखडली असून, अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. काही ठिकाणी वनविभागाच्या अडचणींमुळे योजना बंद आहेत. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे.भोर पंचायत समितीकडे एकूण नऊ गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी चार गावांना तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित गावांनाही लवकरच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहिती सभापती मनीषा कंक आणि उपसभापती विशाल कोंडे यांनी दिली.


