
कोंढव्याला ‘पाकिस्तान’ म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल! दोन समाजांत तेढ निर्माण केल्याचा ठपका
पुणे: सोशल मीडियाच्या माध्यमातून कोंढव्याची बदनामी करणे चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील कोंढवा परिसराची तुलना चक्क ‘पाकिस्तानच्या कराची’शी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी भाजप युवा मोर्चाचे पुणे शहर खजिनदार सर्वेश मेहंदळे यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला असून शहरात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सर्वेश मेहंदळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोंढवा परिसराचा उल्लेख ‘पाकिस्तानचे कराची’ असा केला होता. या व्हिडीओमध्ये सलाम मियाँ, आप आये हो पाकिस्तान के कराची में…असं म्हणत व्हिडीओची सुरुवात केली. त्यानंतर सत्यानंद हॉस्पिटलच्या आवारातील अनधिकृत दुकाने, दारुच्या बाटल्या अशी दुरावस्था दाखवली. रुग्णालयाच्या भोवताली अनधिकृत दुकानांचे मुद्दा उपस्थित केला. यावेळी मेंहदळे यांनी कोंढवामध्ये हिंदूना त्रास दिला जात असल्याचे सांगितले. कोंढवा हा ‘मिनी पाकिस्तान’ असल्याचा उल्लेख केला.हे वक्तव्य समाजमाध्यमांवर पसरताच त्याचे तीव्र पडसाद उमटले. पुणेकरांनी आणि विशेषतः कोंढवा भागातील नागरिकांनी या विधानाबद्दल संताप व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी समोर आलेल्या या व्हिडिओनंतर कोंढवा पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन जोरदार निदर्शने केली. कोंढव्याला पाकिस्तान बोलणे, पाकिस्तानमधील शहराच्या नावाने उल्लेख करणे हे चुकीचं असल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला.

पोलिसांची कारवाई.
कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि सामाजिक शांतता बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. पोलिसांनी सर्वेश मेहंदळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२) (शांतता भंग करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हेतुपुरस्सर अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. समाजात दोन गटात द्वेष निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते, मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे शहराच्या भागांची तुलना थेट दुसऱ्या देशातील शहरांशी केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे.

