
मुंबईत पुन्हा एकदा बेदरकार ड्रायव्हिंगचा भीषण प्रकार समोर आला आहे. पवईतील आयआयटी मार्केटजवळ असलेल्या जेव्हीएलआर (JVLR) मार्गावर शनिवारी रात्री उशिरा एका भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.

नियंत्रण सुटले आणि पादचारी हवेत उडाले…

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा आयआयटी मार्केट परिसरातून एक पांढऱ्या रंगाची क्रेटा कार अत्यंत वेगाने जात होती. जेव्हीएलआर मार्गावर महात्मा फुले नगरजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही सुसाट कार थेट पादचाऱ्यांमध्ये शिरली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, धडक बसलेले तिघेही जण हवेत उडून काही अंतरावर फेकले गेले. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

एक महिला मृत्यूशी झुंज देतेय
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर दोन जखमींवरही उपचार सुरू आहेत.
१९ वर्षीय चालक अटकेत
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पवई पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून अवघ्या काही तासांत १९ वर्षीय आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. एमआयडीसी झोन १० चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध ‘हिट-अँड-रन’ आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईत सातत्याने होणाऱ्या हिट अँड रनच्या घटनांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

