Latest Marathi News
Ganesh J GIF

नागपूरच्या आई आणि मुलीच्या मृत्यूमागे हुंड्याचं कनेक्शन?; पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या हुंडाबळी प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच आता राज्याची उपराजधानी नागपूरमधून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींच्या सततच्या छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुण मुलीने आणि तिच्या शिक्षिका असलेल्या आईने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

माय-लेकीचा करुण अंत

संगीता ढबाले (५५, आई) आणि आकांक्षा ब्रह्मणे (२७, मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. आकांक्षा ही व्यवसायाने इंजिनिअर होती, तर तिची आई संगीता या पेशाने शिक्षिका होत्या. आकांक्षाच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वीच निधन झाल्याने आईनेच तिचा सांभाळ केला होता.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर काही दिवसातच आकांक्षाला सासरच्या जाचाला सामोरे जावे लागले. आकांक्षाचा गर्भपात झाल्यानंतर ती माहेरी आईकडे राहायला आली होती. आरोपी पती आणि सासरची मंडळी संगीता ढबाले आणि त्यांच्या आईच्या (आकांक्षाची आजी) नावावर असलेली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी माय-लेकीचा सतत मानसिक छळ करत होते.संपत्ती आणि हुंड्याच्या लोभापोटी सासरच्यांनी केलेल्या छळामुळेच या माय-लेकीने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सुसाईड नोटमध्ये पतीचा उल्लेख

पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमधील मजकुरावरून आणि प्राथमिक तपासावरून पती लोकेश ब्रम्हे यानेच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून हस्ताक्षराची पडताळणी सुरू आहे.नंदनवन पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ५ जणांवर गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये लोकेश ब्रम्हे (पती),सुधाकर ब्रम्हे (सासरा), सासू,नणंद, भाचा या आरोपींचा समावेश आहेपोलिसांनी पती लोकेश ब्रम्हे याला अटक केली असून हुंडाबळी कायद्यासह विविध कलमांनुसार पुढील तपास केला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!