Latest Marathi News
Ganesh J GIF

कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी पीएचा पत्नीवर जीवघेणा हल्ला; कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यातील गुन्हेगारीने आता थेट मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे. नसरापूरच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, पुण्यातील क्वीन गार्डन परिसरात एका कॅबिनेट मंत्र्याच्या खासगी स्वीय सहाय्यकाने आपल्या पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

नेमकी घटना काय?

ही धक्कादायक घटना ३० एप्रिल रोजी पुणे स्टेशनजवळील क्वीन्स गार्डन येथे घडली. आरोपी विजय कारंडे, जो एका मंत्र्याचा ओएसडी म्हणून कार्यरत आहे, तो घरी मोबाईलवर चॅटिंग करत होता. या चॅटिंगबाबत पत्नीने विचारणा केली असता, विजयचा संयम सुटला. त्याने पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तिचा गळा आवळून तिला संपवण्याचा प्रयत्न केला.

पोटच्या मुलावरही बॅटने हल्ला

आई-वडिलांमधील हा वाद विकोपाला गेलेला पाहून त्यांचा मुलगा मध्यस्थी करण्यासाठी आला होता. मात्र, संतापलेल्या विजयने चक्क क्रिकेटच्या बॅटने मुलालाही बेदम मारहाण करून जखमी केले. या भीषण हल्ल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला, तर जखमी पत्नीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंत्रालयात खळबळ; पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याची प्राथमिक नोंद सुरुवातीला अहिल्यानगरमध्ये करण्यात आली होती, जी आता तपासासाठी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे.पुणे पोलीस आता या हायप्रोफाईल प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!