Latest Marathi News
Ganesh J GIF

१५ वर्षांच्या मुलीवर पिता अन् मामानेच केला अत्याचार

ज्या नात्यांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, तीच नाती जेव्हा रक्ताने माखलेली आणि नराधम निघतात, तेव्हा माणुसकीवरचा विश्वास उडतो. कोल्हापूर जिल्ह्यातून अशीच एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून तिचे जन्मदाते वडील, सख्खा मामा आणि चुलत भावाकडून अत्याचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वयाच्या ९ व्या वर्षापासून छळ सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जेव्हा अवघ्या ९ वर्षांची होती, तेव्हापासून हा अत्याचाराचा सिलसिला सुरू झाला. निरागस वयात ज्या बापाने संरक्षण द्यायला हवे होते, त्याच बापाने तिच्यासोबत अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. पाठोपाठ मामानेही तिच्यावर वाकडी नजर टाकली आणि ही नराधम वृत्ती इथेच थांबली नाही, तर मामाच्या अल्पवयीन मुलानेही संधी मिळेल तेव्हा तिच्यावर अत्याचार केले.

अत्याचाराला कंटाळून आईने सोडलं घर

गेल्या पाच वर्षांपासून हा नरकयातनांचा खेळ सुरू होता. घरात कोणीही नसताना इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील निवासस्थानी हे अत्याचार केले जात होते. हा सर्व प्रकार जेव्हा मुलीच्या आईला समजला, तेव्हा तिने आपल्या पोटच्या मुलीला वाचवण्यासाठी नराधम पती आणि नातेवाइकांपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली होती.

पोलिसांची तात्काळ कारवाई

अखेर मंगळवारी (दि. ५ मे) पीडितेच्या आईने धीर एकवटला आणि कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परतेने पावले उचलली आणि नराधम वडील व मामाला बेड्या ठोकल्या.

“संशयित आरोपींना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.”
– संतोष डोके, पोलीस निरीक्षक, शाहूपुरी पोलीस ठाणे

अवघ्या १५ वर्षांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमांना फाशीची किंवा जन्मठेपेची कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या आईने आणि सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून नात्यांमधील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!