
“इन्स्टाग्रामवर धमकावलं अन् घात झाला! लातूरच्या तरुणाने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी लिहिलं धक्कादायक सत्य.”
प्रेमप्रकरणातून निर्माण झालेला वाद आणि त्यानंतर सोशल मीडियावरून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांना कंटाळून लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील मोरवड येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.तेजस दिलीप घोडके असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून घोडके कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, तेजसचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाला होता. या वादातून आरोपींनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून तेजसला धमकावणे, त्याची बदनामी करण्याची भीती दाखवणे आणि सतत मानसिक दबाव टाकणे सुरू केले होते. या त्रासाला कंटाळून तेजसने शेतात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी तेजसने एक सुसाईड नोट लिहिली असून, त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे मानसिक त्रास दिला गेला आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले, याचा सविस्तर उल्लेख केला आहे

याप्रकरणी मयताचे वडील दिलीप निवृत्ती घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात शिवाजी मोहिते, रोहन काळे, नागेश गंगणे, अशोक गंगणे, पवन मोहिते, किंचक घोडके आणि रंजना घोडके अशा एकूण सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
काय लिहिलं आहे सुसाईड नोटमध्ये?

मी फाशी स्वखुशीने किंवा माझ्या मनाने घेत नाही पण मला मजबूर केलं आहे.
फाशी घेण्यासाठी मला Instagram वर कॉल येत होते. वेगवेगळ्या इन्स्टाआयडी वरून Video ला कमेंट्स येत होत्या की तू मर नाही तर तुझ्या भावाला मारून टाकतो. तुझा भाऊ पुण्याला असली त्याला कोण वाचवणार आहे. तुझा चुलता त्याचा पोरगा रात्री हॉटेलवर असतात त्यांनी लय केल आहे तुझ्यासाठी त्यांना मारतो नाहीतर तुझ्या बापाला मारतो अशा धमक्या येत आहेत हे दुसरं कोणी लिहील आहे असे वाटू नये….

कुटुंबियांची कठोर कारवाईची मागणी
सोशल मीडियावरून धमक्या देणे, बदनामी करण्याची भीती दाखवणे आणि सतत मानसिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप स्वतः तेजस याने सुसाईड नोटमध्ये लिहून केला होता. या सर्वाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आत्महत्येमागील नेमके कारण काय, सोशल मीडियावरील धमक्या कितपत गंभीर होत्या आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. कुटुंबीयांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

