
पुणे हादरलं! इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेऊन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सुरक्षा रक्षक अटकेत
पिंपरी- चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सोसायटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकानेच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.मात्र, एका १० वर्षांच्या मुलीने दाखवलेल्या धैर्यामुळे हा नराधम आता गजाआड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, (शुक्रवारी, ता ८) दुपारी सोसायटीत शांतता असताना आरोपी दिनेश चौधरी याने १०, ८, ६ आणि ८ वर्षे वयोगटातील चार मुलींना टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो असे आमिष दाखवून सातव्या मजल्यावर नेले. तिथे त्याने या मुलींशी अश्लील चाळे करत त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर मारून टाकेन, अशी धमकीही त्याने चिमुरड्यांना दिली होती. आरोपीच्या धमकीमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. मात्र, त्यातील १० वर्षांच्या एका मुलीने न घाबरता घरी पोहोचताच आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतल्याने या नराधम सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, एका सोसायटीमध्ये वॉचमनने एका मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आरोपीला तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मुली अल्पवयीन आहेत, मुलींना वॉचमनने सांगितलं तुम्हाला मी पाण्याची टाकी दाखवतो, असं सांगून तो त्या मुलींना घेऊन वरती ७ व्या मजल्यावरती गेला. तिथे त्याने विनयभंग केल्याची तक्रार मिळाली त्यातील एका मुलीने आईला सांगितलं त्यामुळे घटना उघडकीस आली, त्यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहचून त्याला ताब्यात घेतलं आहे. त्या वॉचमनचा त्या सोसायटीतील कामाचा पहिलाच दिवस होता.


