
महाराष्ट्र राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला काही भागांना पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला काही जिल्हे उष्णतेच्या लाटेने होरपळून निघत आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांसाठी आज दिलासादायक बातमी आहे, तर विदर्भातील नागरिकांना मात्र तूर्तास उन्हाच्या चटक्यांपासून सुटका मिळण्याची चिन्हे नाहीत.

पुणेकरांना उकाड्यापासून मिळणार दिलासा?

पुण्यात गेल्या काही दिवसांत उन्हाचे चटके काहीसे कमी झाले असले, तरी हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा प्रचंड वाढला आहे. वाढलेल्या या उकाड्याने आणि घामाने पुणेकर पुरते बेजार झाले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज शहरात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन पुणेकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने केवळ पुणेच नाही, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतरही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे,अहिल्यानगर,सोलापूर,धाराशिव,बीड,लातूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
विदर्भात उष्णतेचा ‘रेड’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट!
राज्याच्या दुसऱ्या भागात म्हणजेच विदर्भात मात्र सूर्याचा प्रकोप कायम असून, तिथे तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात उन्हाची तीव्र लाट रविवारीही कायम होती आणि आजही ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचा नागरिकांना आवाहन
हवामानातील या अनपेक्षित आणि वेगवान बदलांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील या बदलांची नोंद घेऊन स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: (https://maharashtrakhabar.com/manisha-havaldars-confession-takes-a-different-turn-in-the-investigation-chat-deleted-notes-burned-who-is-the-mastermind/)

