Latest Marathi News
Ganesh J GIF

मनीषा हवालदारच्या कबुलीने तपासाला वेगळेच वळण!; चॅट डिलीट, नोट्सही जाळल्या; सूत्रधार कोण?

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने आणखी एक सर्वात मोठा आणि चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेली एनटीए पॅनेलवरील फिजिक्सची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून धक्कादायक गुपिते उघड झाली आहेत. मनीषाच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘God’ या नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक नेमका कोणाचा, याचा अखेर छडा लागला असून यामुळे या महाघोटाळ्याला एक नवीन वळण मिळाले आहे.

‘God’ नावाने सेव्ह असलेला ‘तो’ नंबर कोणाचा? उलगडा झाला!

मनीषाच्या फोनमधील ‘God’ आणि ‘डॉ. उषा’ या दोन नावांनी सीबीआयचे लक्ष वेधून घेतले होते. सीबीआयच्या फॉरेन्सिक तपासात आता समोर आले आहे की, ‘God’ नावाने सेव्ह असलेला मोबाईल नंबर हा ‘तेजस शहा’ नावाच्या विद्यार्थ्याचा आहे. या एकाच नंबरमुळे आता पेपरफुटीचे खूप मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या तेजस शहामार्फत पैशांची देवाणघेवाण आणि प्रश्न वाटपाचे काम कसे चालत होते, याचा सखोल तपास आता सीबीआय करत आहे.

पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या; चॅट्स केले डिलीट!

तपास यंत्रणांच्या हाती काही लागू नये म्हणून मनीषा हवालदार हिने कमालीची सावधगिरी बाळगली होती. तिने स्वतः तयार केलेल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स चक्क जाळून खाक केल्या होत्या. तसेच, सहआरोपी आणि जीवशास्त्राची प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्याशी केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅट्स डिलीट करून डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. विशेष म्हणजे, प्रश्नमालिका पुढे पाठवण्यासाठी तिने केवळ स्वतःचाच नाही, तर पतीच्या मोबाईलचाही छुप्या पद्धतीने वापर केला होता.

सदाशिव पेठेतील घरात सापडली लाखांची रोकड

२२ मे रोजी पुण्याच्या सदाशिव पेठेतील मनीषा हवालदारच्या निवासस्थानी सीबीआयने मोठा छापा टाकला होता. या कारवाईत सीबीआयच्या हाती लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रतींसह १ लाख १ हजार ९३० रुपयांची रोकड लागली आहे. काही विशिष्ट विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात तिने ही मोठी रक्कम स्वीकारल्याची कबुली दिल्याचे समजते.

टेलिग्रामद्वारे कोट्यवधींचा गंडा आणि ‘केमिस्ट्री’ कनेक्शन!

या संपूर्ण घोटाळ्यात सायबर गुन्हेगारांनी ‘टेलीग्राम’ ॲपचा वापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. परीक्षेच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना लक्ष्य करत भामट्यांनी टेलिग्रामवर ‘लीक पेपर’ आणि ‘१००% सक्सेस’ अशा नावांचे बनावट ग्रुप्स तयार केले होते.

तसेच, मनीषा हवालदारच्या चौकशीत आता रसायनशास्त्र विषयाच्या एका तज्ज्ञ प्राध्यापिकेचे नावही समोर आले आहे. या तज्ज्ञाच्या सांगण्यावरूनच प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले होते. त्यामुळे एनटीए पॅनेलचे धागेदोरे आता पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात आले असून या प्रकरणाचे कनेक्शन आता पुण्यापासून लातूर आणि थेट राजस्थानपर्यंत पोहोचले आहे. डिलीट केलेले चॅट्स रिकव्हर करण्यासाठी सीबीआय आता सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.

हे देखील वाचा: (https://maharashtrakhabar.com/new-twist-in-tcs-conversion-case-minority-defense-committee-backs-the-accused/)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!