
एटीएममधील (ATM) एक किरकोळ तांत्रिक बिघाड आणि बँकेचा ढिसाळ कारभार स्टेट बँक ऑफ इंडियासाठी (SBI) चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. एका ग्राहकाच्या अवघ्या ४०० रुपयांच्या तक्रारीचे वेळेवर निवारण न केल्यामुळे, ग्राहक आयोगाने बँकेला चांगलाच इंगा दाखवला आहे. आता बँकेला ग्राहकाला चक्क ५८,७०० रुपयांची नुकसान भरपाई आणि दंड भरावा लागणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

हे धक्कादायक पण तितकंच रंजक प्रकरण छत्रपती संभाजीनगर येथील आहे. २०१६ मध्ये येथील एका रहिवासी ग्राहकाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या एसबीआयच्या एटीएममधून १,५०० रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मशीनमधून प्रत्यक्षात फक्त १,१०० रुपयेच बाहेर आले. म्हणजेच ग्राहकाला ४०० रुपये कमी मिळाले.सुरुवातीला ही रक्कम अत्यंत किरकोळ वाटली, पण बँकेच्या निष्काळजीपणामुळे हा वाद थेट ग्राहक आयोगापर्यंत पोहोचला.

बँकेने फेऱ्या मारायला लावल्या, पण प्रश्न सोडवला नाही!
एटीएममधून कमी पैसे आल्याचे लक्षात येताच, ग्राहकाने तातडीने बँकेला कळवले आणि ४ ऑक्टोबर २०१६ रोजी लेखी तक्रार दाखल केली. ही तक्रार बँकेच्या ग्राहक सेवा विभागापासून ते नोडल अधिकारी आणि बँकिंग लोकपाल यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. तरीही बँकेने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. हा ग्राहक न्याय मिळवण्यासाठी अनेक वर्षे बँकेच्या चकरा मारत राहिला, पण बँकेने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी कंटाळून ग्राहकाने जिल्हा ग्राहक आयोगाचे दार ठोठावले.
RBI चा ‘हा’ नियम बँकेच्या अंगलट आला!
जिल्हा ग्राहक आयोगाने या प्रकरणात बँकेला दोषी धरले. बँकेने ग्राहकाची तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि आरबीआयच्या (RBI) नियमांचे उल्लंघन केले, असे आयोगाने स्पष्ट केले.
काय आहे RBI चा नियम?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, जर एटीएममधून पैसे आले नाहीत किंवा कमी आले, तर बँकेने ७ कामकाजाच्या दिवसांत ती तक्रार सोडवणे बंधनकारक आहे. जर निर्धारित वेळेत तक्रार सुटली नाही, तर बँकेला ग्राहकाला दररोज १०० रुपये नुकसान भरपाई द्यावी लागते.
जिल्हा आयोगाच्या या निर्णयाविरोधात एसबीआयने राज्य आयोगाकडे अपील केले होते. मात्र, राज्य आयोगाने बँकेचे अपील फेटाळून लावत आणखी १०,००० रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावला. त्यामुळे ४०० रुपयांची तूट आता बँकेला जवळपास ५९ हजारांना पडली आहे.

