
मध्य रेल्वे प्रवास आणखी महागला! ; १ जूनपासून प्लॅटफॉर्मवरील चहा, वडापावसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
मध्य पूर्वेतील संकटामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली आहे. आधी वाढते पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, आता लोकांच्या आवडीचे खाद्यपदार्थही महागू लागले आहेत. सामान्य रेल्वे प्रवाशांना एक मोठा झटका देत मध्य रेल्वेने वडापावसह अनेक लोकप्रिय स्नॅक्सचे दर वाढवण्यास मंजुरी दिली आहे.येत्या १ जूनपासून मध्य रेल्वेच्या स्टेशन्सवर वडापाव खाणे अधिक महाग होणार आहे. मध्य रेल्वेने आपल्या ‘मायनर स्टॅटिक कॅटरिंग’ स्टॉलवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमतींमधील बदलाला हिरवा कंदील दाखवला आहे.

आता १ जूनपासून कितीला मिळणार एक वडापाव?

नवीन दर लागू झाल्यानंतर स्टेशनवर ५० ग्रॅमच्या एका बटाटा वड्याची किंमत आता १५ रुपये केली जाणार आहे. म्हणजेच १ जूनपासून स्टेशनवर नवीन मेनू आणि सुधारित दर पूर्णपणे लागू होतील.

फक्त वडापावच नाही, ‘हे’ स्नॅक्सही झाले महाग!
मध्य रेल्वेने वडापावव्यतिरिक्त प्रवाशांच्या इतरही अनेक आवडत्या पदार्थांच्या किंमती वाढवल्या आहेत.नव्या दरपत्रकानुसार बटाटा वडा१५ रुपये,व्हेज समोसा २० रुपये, व्हेज पफ २० रुपये, साबुदाणा वडा २० रुपये,पावभाजी ५० रुपये,व्हेज पिझ्झा ५० रुपये,मसाला डोसा ३५ रुपये,इडली सांबार/चटणी३० रुपयाला मिळणार आहे
सुदैवाने ‘या’ पदार्थांचे भाव स्थिर!
काही पदार्थांच्या किंमतीत मात्र रेल्वेने कोणताही बदल केलेला नाही, ज्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे.मिसळ पाव ३५ रुपये,कचोरी १५ रुपये,दाबेली २० रुपये
किंमत तर वाढवली, पण रेल्वेने स्टॉलधारकांना दिला ‘हा’ कडक आदेश!
रेल्वे प्रशासनाने केवळ भाववाढ केली नसून, वेंडर्सना एक कडक इशारा आणि आदेशही दिला आहे. किंमती वाढवल्या असल्यामुळे स्टॉलधारकांना खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये मोठी सुधारणा करावी लागेल. प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व स्टॉलधारकांना आपल्या दुकानांवर दोन भाषांमध्ये (द्विभाषिक) दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे. स्टेशनवर प्रवाशांकडून जास्त पैसे उकळण्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आणि खाद्यपदार्थांचा दर्जा तपासण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अचानक आणि नियमित तपासणी केली जाईल.त्यामुळे आता १ जूनपासून लोकल प्रवासादरम्यान वडापाव किंवा समोशावर ताव मारण्यापूर्वी खिशाचा अंदाज नक्की घ्या!

