Latest Marathi News
Ganesh J GIF

परभणी-हिंगोलीत महायुतीत रस्सीखेच!; मुलाच्या उमेदवारीसाठी अर्जुन खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीमधील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिंदेसेनेचे ज्येष्ठ आमदार तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आपले सुपुत्र अभिमन्यू खोतकर यांच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी मंगळवारी थेट उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुलाच्या उमेदवारीसाठी ‘जोरदार फिल्डिंग’

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्ष म्हणजेच शिंदेसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी दावा ठोकला आहे. या जागेवरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच खोतकरांनी घेतलेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अभिमन्यू खोतकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पूर्ण पाठिंबा मिळावा, यासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.विशेष म्हणजे, यापूर्वीच अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही आपल्या मुलासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून, आता अजित पवार गटाची साथ मिळवण्यासाठी त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.

भास्कर अंबेकरांच्या नावासाठीही खोतकर आग्रही!

या महत्त्वपूर्ण बैठकीत केवळ अभिमन्यू खोतकर यांच्याच नावावर चर्चा झाली नाही, तर मराठवाड्यातील दुसऱ्या एका जागेसाठीही खोतकरांनी फिल्डिंग लावली आहे.जालन्याचे माजी नगराध्यक्ष आणि शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख भास्कर अंबेकर यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संधी मिळावी, यासाठी अर्जुन खोतकर आग्रही आहेत.या जागेसाठीही राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अंबेकर यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी खोतकर यांनी या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

इच्छुकांची धाकधूक वाढली; नव्या समीकरणांची नांदी?

महायुतीतील जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले आहे. एकीकडे भाजपकडूनही विविध मतदारसंघांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असतानाच, दुसरीकडे शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वाढत्या भेटीगाठींमुळे महायुतीत नवे राजकीय समीकरण निर्माण होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्जुन खोतकर यांनी अचानक वाढवलेल्या या राजकीय हालचालींमुळे महायुतीमधील इतर इच्छुकांमध्ये मात्र चांगलीच चुरस वाढली असून त्यांची धाकधूक वाढली आहे.
आता आगामी काळात परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालनाची जागा नक्की कोणाच्या पदरात पडते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!