
सोलापूरच्या सीमेवर शेतीच्या वादातून हत्याकांड; सहाजणांना भररस्त्यात गोळ्या घातल्या, गळे चिरले, हात छाटले
सोलापूरच्या सीमेवर असलेल्या कर्नाटक हद्दीतील गोविंदपूर गावात एका भीषण हत्याकांडाची घटना घडली आहे. शेतीच्या वादातून भररस्त्यात सहा जणांवर गोळ्या झाडून, त्यांचे गळे चिरून आणि हात छाटून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या धक्कादायक घटनेमुळे विजयपूर आणि सोलापूर जिल्हा हादरला असून, गोविंदपूर गावात सध्या तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

पूर्ववैमनस्य आणि शेतीचा वाद कारणीभूत
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदपूर (ता. चडचण, जि. विजयपूर, कर्नाटक) येथील निराळे कुटुंब आणि गुळगी (गोलगी) कुटुंब यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतजमिनीच्या खरेदीवरून तीव्र संघर्ष सुरू होता. याच शेतीच्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हे हत्याकांड घडल्याची चर्चा आहे.

भररस्त्यात क्रूर हल्ला
शुक्रवारी सायंकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गावात प्रवेश केला. त्यांनी भररस्त्यात निराळे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यावर अचानक गोळीबार सुरू केला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी थांबून निराळे कुटुंबातील सदस्यांवर कोयत्याने भीषण वार केले. यात काहींचे गळे चिरण्यात आले, तर काहींचे हात छाटण्यात आले.

या अत्यंत क्रूर हल्ल्यामध्ये खालील सहा जणांचा रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यू झाला:
रेवणसिद्धप्पा निराळे
दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे
शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे
चंद्रशेखर निराळे
शब्बीर अत्तार (निराळे कुटुंबाचे सहकारी)
निराळे कुटुंबातील आणखी एक सदस्य
या भीषण हत्याकांडात एकाच कुटुंबातील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गावात पोलीस बंदोबस्त, हल्लेखोर फरार
हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच चडचण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि सुरक्षेचा उपाय म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस सध्या फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

