
राज्य विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये निर्माण झालेला बंडखोरीचा पेच सोडवण्यासाठी अखेर आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मित्रपक्षांच्या अंतर्गत कलहामुळे मतदारांमध्ये निर्माण होणारा संभ्रम टाळण्यासाठी, महायुतीने पत्रकार परिषद घेऊन आपल्या १७ अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. तसेच सर्व बंडखोर उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याचे कडक आवाहन केले आहे.

संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीच्या अवघा एक दिवस आधी महायुतीने हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना (शिंदे गट) नेते राहुल शेवाळे यांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या १७ उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. या अधिकृत यादीवर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जागांचे गणित; शिंदेंची शिवसेना ५, तर राष्ट्रवादीला २ जागा
शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या राजकीय चुरशीनंतर महायुतीमधील जागांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अंतर्गत तणाव आणि स्थानिक पातळीवरील विरोध झुगारून शिवसेनेने ५ जागांवर आपले उमेदवार निश्चित केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या प्रमुख मागण्यांवर ठाम राहिली आणि पक्षाने २ जागा पदरात पाडून घेतल्या आहेत.
पुणे आणि कोकणात राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित
स्थानिक शिवसेना नेत्यांसोबत असलेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवरही राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग (कोकण स्थानिक स्वराज्य संस्था) आणि पुणे या जागांवर आपले वर्चस्व राखले आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेले उमेदवार
१. पुणे मतदारसंघ: संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२. कोकण मतदारसंघ: माजी आमदार अनिकेत तटकरे यांना पुन्हा रिंगणात उतरवण्यात आले आहे.
१८ जूनला फैसला!
महायुतीचे नेते रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना आवाहन केले आहे की, त्यांनी निवडणुकीत महायुतीच्याच अधिकृत उमेदवारांना ‘पहिली पसंती’ देऊन मतदान करावे. या बहुप्रतिक्षित विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

