Latest Marathi News
Ganesh J GIF

‘नसीब में होगा तो…’; मुलाला तिकीट न मिळाल्याने गुलाबराव पाटील प्रचंड नाराज!

जळगाव विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते गुलाबराव पाटील प्रचंड नाराज आहेत. आपल्या मुलाला आमदार करण्याचं स्वप्न अधुरं राहिल्याची खदखद त्यांनी आज जळगावातील एका जाहीर कार्यक्रमात आपल्या खास स्टाईलने शेरोशायरी करत बोलून दाखवली आहे.

शेवटच्या मिनिटापर्यंत मुंबईत ठाण, पण…

गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी गुलाबराव पाटलांनी अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न केले होते. उमेदवारी जाहीर होईपर्यंत ते मुंबईत ठाण मांडून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी ३ ते ४ वेळा वैयक्तिक चर्चाही केली. मात्र, भाजपने जळगावची जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने गुलाबराव पाटलांच्या पदरी अखेर निराशा आली.

‘नसीब में होगा तो उचलकर आयेगा…’

आज जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले “अनेक लोक म्हणतात की तुम्हाला विधान परिषदेसाठी तिकीट मिळालं नाही. मात्र मी एवढेच सांगतो, ‘नसीब मे होगा तो उचलकर आयेगा और नसीब में नही होगा तो आकर चला जायेगा’… देवाच्या मनात यापेक्षाही पुढे आयुष्यात काही चांगलं देण्याचं असेल, त्यामुळे प्रारब्धावर विश्वास ठेवा”. सोबतच कार्यकर्त्यांना सल्ला देताना ते म्हणाले, “सगळं करा, राजकारण जरूर करा, पण भगवा प्रकाशातील विचार कधी सोडू नका.”

भाजप उमेदवाराच्या अर्ज भरण्याला सेनेची दांडी; महायुतीला फटका बसणार?

गुलाबराव पाटलांची ही नाराजी केवळ भाषणापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट कृतीतूनही दिसून आली आहे. जळगावमधील भाजप उमेदवाराचा अर्ज भरताना गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्णपणे गैरहजर राहिले.निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात उघडपणे दिसणाऱ्या या नाराजीचा थेट फटका महायुतीच्या भाजप उमेदवाराला बसण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे ही नाराजी विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!