
भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे डॅशिंग आमदार गोपीचंद पडळकर यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामाजिक बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फेसबुकवर आमदार पडळकरांची प्रतिमा मलिन होईल अशा स्वरूपाच्या आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी तब्बल १४ फेसबुक आयडीधारकांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ जून रोजी घडला प्रकार; २१ वर्षीय तरुणाची फिर्याद

याप्रकरणी करण चंद्रकांत लवटे (वय २१, रा. पुजारवाडी, ता. आटपाडी) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फेसबुकवरील विविध अकाऊंट्स आणि पेजेसवरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला होता.संबंधितांना या पोस्टमुळे समाजात तेढ किंवा आमदारांची प्रतिमा मलिन होईल हे माहित असतानाही, त्यांनी जाणीवपूर्वक हा मजकूर व्हायरल केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

अश्लील नावांचे आयडी; ‘या’ संशयितांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये काही अधिकृत नावांसह काही अश्लील आणि बनावट नावांच्या फेसबुक आयडींचाही समावेश आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आयडीधारकांची नावे किरण हुलवाल,संकेत गावडे,संदीप तुपे,धनाजी यमगर,अनिकेत दिने,विजयाताई मोटे एफसी, संदीपा निगडी,नीलेश पडळकर,सचिन मोटे,सुनील धनगर,प्रेरणास्थान सचिन मोटे,हणमंतराव पवार यांच्यासह अन्य दोन अज्ञात फेसबुक आयडीधारकांचा समावेश आहे.
पोलिसांचा इशारा…
राजकीय नेत्यांची किंवा कोणत्याही व्यक्तीची सोशल मीडियावर बदनामी करणे कायदेशीर गुन्हा आहे. आटपाडी पोलिसांनी या १४ आयडीधारकांचा शोध सुरू केला असून सायबर पोलिसांच्या मदतीने पुढील तपास अत्यंत वेगाने केला जात आहे.

