Latest Marathi News
Ganesh J GIF

राम मंदिराच्या दानपेटीतून ५ कोटींची चोरी; संजय राऊतांचा भाजपवर अत्यंत गंभीर आरोप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. “पंडित नेहरूंनी कधीही विरोधी पक्ष फोडले नाहीत, जे काम आज मोदी आणि शाह करत आहेत,” अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला.

नेहरूंच्या कार्याची आणि लोकशाहीची तुलना

संजय राऊत यांनी यावेळी पंडित नेहरूंच्या कार्यकाळाची तुलना सध्याच्या राजकीय परिस्थितीशी केली. ते म्हणाले, “नेहरूंच्या काळात संसदेत अटल बिहारी वाजपेयींसारखे बुलंद नेते नेहरूंच्या तोंडावर टीका करायचे. अनेक राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे होती, पण नेहरूंनी कधीही सत्तेचा गैरवापर करून कोणाचे पक्ष किंवा संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. आज मात्र पंतप्रधानपदाच्या घोडदौडीखाली लोकशाही आणि निवडणूक आयोग पायदळी तुडवला जात आहे.”

१२ वर्षांचे आत्मचिंतन आणि पत्रकार परिषदेचे आव्हान

पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर बोट ठेवताना राऊत यांनी त्यांना एक सल्लावजा आव्हान दिले. ते म्हणाले “पंतप्रधानांनी आता एक तप पूर्ण झाल्यानंतर केदारनाथच्या गुहेत जाऊन आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत १२ वर्षांचे आत्मचिंतन केले पाहिजे. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या १२ वर्षांत नक्की काय केले, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे. १२ वर्षे झाली तरी त्यांनी अद्याप एकाही प्रश्नाला थेट उत्तर दिलेले नाही.”

नेहरूंनी संपत्ती दिली, मोदींनी काय दिले?

पंडित नेहरूंच्या वारशावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “नेहरूंनी देशासाठी स्वतःची सर्व संपत्ती दान केली, ज्याची आजची किंमत ८० हजार कोटी रुपये आहे. त्यांच्या काळात अदानी-अंबानी निर्माण झाले नाहीत, तर त्यांनी LIC, IIT आणि तेल कंपन्यांसारखे सार्वजनिक उद्योग उभे केले. मोदींनी नेहरूंचा केवळ पदावर राहण्याचा विक्रम मोडला असेल, पण त्यांच्या कार्याचा विक्रम मोडणे अशक्य आहे.”

राम मंदिराच्या दानपेटीवर गंभीर आरोप

या पत्रकार परिषदेतील सर्वात खळबळजनक मुद्दा ठरला तो म्हणजे राम मंदिराच्या दानपेटीचा. संजय राऊत यांनी थेट आरोप केला की, राम मंदिराच्या दानपेटीतून ५ कोटी रुपये चोरीला गेले आहेत. संपूर्ण व्यवस्था भाजपच्या ताब्यात असताना ही चोरी कशी होते? हे अत्यंत गंभीर आहे.तसेच, जागतिक दबावामुळे सरकारला ‘ऑपरेशन सिंदूर’ गुंडाळावे लागले, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. या आक्रमक पवित्र्यामुळे आता राजकीय वर्तुळातून भाजप यावर काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!