Latest Marathi News
Ganesh J GIF

पुरंदर विमानतळासाठी ६०% शेतकऱ्यांची संमती; एकाच महिन्यात ७३५ हेक्टर जमीन प्रशासनाच्या ताब्यात, ९०० कोटींचे वाटप!

पुण्याच्या नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता मोठी गती मिळाली आहे. विमानतळासाठी जमीन देण्याकरिता स्थानिक शेतकऱ्यांकडून अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, आवश्यक १२१६ हेक्टरपैकी तब्बल ७३५ हेक्टर क्षेत्र जमीन देण्यास शेतकऱ्यांनी आपली संमतीपत्रे जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली आहेत. अवघ्या एका महिन्यात ६० टक्के शेतकऱ्यांची संमती मिळवण्यात प्रशासनाला यश आले असून, आता संमती देण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत आहे.

शेतकऱ्यांना कोट्यवधींचा मोबदला; ‘हुडको’कडून ६००० कोटींचे कर्ज

या भव्य प्रकल्पासाठी राज्य सरकारने हुडकोकडून ६००० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या निधीतून संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ९०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.शेतकऱ्यांना प्रतिएकर १.६१ कोटी रुपये मोबदला दिला जात आहे. जर संपादित जमिनीवरील घरे, फळबागा किंवा बोअरवेल बाधित होत असतील, तर शेतकऱ्यांना जमिनीच्या किमतीच्या चौपट म्हणजेच तब्बल दोन कोटी रुपये रक्कम मोबदला म्हणून दिली जात आहे.

गावनिहाय मिळालेली संमती (एकूण ७ गावे)

विमानतळासाठी ७ गावांतील एकूण १८८७ शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७३५.२५ हेक्टर जमिनीसाठी संमती दिली आहे. खानवडी गावामधील २६० शेतकऱ्यांची १५०.८८ हेक्टर जमीन, एखतापूरमधील २९८ शेतकऱ्यांची १४६.५० हेक्टर जमीन, वनपुरीमधील २६५ शेतकऱ्यांची ११८.४५६० हेक्टर जमीन , कुंभारवळणातील २५० शेतकऱ्यांची ११२ हेक्टर जमीन, पारगावमधील ५८० शेतकऱ्यांची १००.४२ हेक्टर जमीन, मुंजवडीतील १७५ शेतकऱ्यांची ६५ हेक्टर जमीन आणि उदातीवाडीतील ५९ शेतकऱ्यांची ४२ हेक्टर जमीन अशा एकूण १८८७ शेतकऱ्यांनी संमती दिली असून ७३५.२५ हेक्टर जमीन मिळाली आहे. सात मेपासून सुरू झालेल्या या भूसंपादन प्रक्रियेद्वारे १२१६ हेक्टर जमीन संपादित करण्याचं उद्दिष्ट आहे.

प्रक्रियेला गती देण्यासाठी वकिलांचे विशेष पथक

जमिनींचा ‘सर्च रिपोर्ट’ तयार करण्यास वेळ लागत असल्याने जिल्हा प्रशासनाने पाच वकिलांचे एक विशेष पथक नियुक्त केले आहे. सात गावांतील अनेक जमिनींचे दावे सध्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे मिळण्यास काहीसा विलंब होत आहे.

“पुरंदर विमानतळासाठी एका महिन्यात ७३५ हेक्टर क्षेत्रासाठी संमती देण्यात आली असून, संमतीची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने त्यांचा मोबदला त्वरित बँक खात्यात वितरित केला आहे.”

-जितेंद्र डुडी (जिल्हाधिकारी, पुणे)

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!