
आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील इच्छा असते. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत आणि २०२९ मध्ये त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढू. तसेच, सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या सर्वोच्च पदावर जावे, म्हणजेच ‘देवाभाऊंचे’ केंद्रात प्रमोशन व्हावे,” असे अत्यंत मोठे आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे विधान प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

‘शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न केला, तर…’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जिल्ह्यातील एका शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण न दिल्यामुळे महायुतीत शिवसेना (शिंदे गट) नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यावर बोलताना बच्चू कडू यांनी महायुतीतील सहकाऱ्यांना थेट इशारा दिला. ते म्हणाले, “डावलल्यामुळे शिवसेना थांबणार नाही. ही सेना आहे आणि सेना कधीच थांबत नसते. त्यामुळे कोणी चुकूनही डावलण्याचा प्रयत्न केला, तर येणाऱ्या काळात तसे दिवस (परिणाम) दिसल्याशिवाय राहणार नाहीत.” तसेच २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या राजकीय घडामोडींचा दाखला देत, “राजकारणात दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असेही ते पुढे म्हणाले.

शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मागण्यांचा धडाका
स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या बच्चू कडू यांनी यावेळी शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावर सरकारचे कान टोचले. “आमच्या डोक्यातून शेतकरी आणि दिव्यांग कधीही जाणार नाहीत,” असे सांगत त्यांनी खालील प्रमुख मागण्या मांडल्या
प्रोत्साहन निधी १ लाख करा : नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे सानुग्रह (प्रोत्साहन) अनुदान ५० हजारांवरून थेट १ लाख रुपये करण्यात यावे.
हमीभाव मिळेपर्यंत मदत द्या : जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारने हा प्रोत्साहन निधी सुरूच ठेवला पाहिजे.
दिव्यांगांना सरसकट कर्जमाफी : राज्यातील दिव्यांग बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी.
ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला ‘नाही’ म्हणणाऱ्या सरकारला केवळ शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळेच कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली आहे. मात्र, जुन्या कर्जमाफीचे पैसे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसून, प्रोत्साहन निधीपासूनही अनेक जण वंचित असल्याकडे त्यांनी बोट दाखवले.

