
‘राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची अट मान्य नव्हती म्हणून…’; नवनीत राणांनी फेसबुक पोस्टद्वारे केला मोठा खुलासा!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. मात्र, या जागेसाठी माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नावाची प्रचंड चर्चा होती. आपल्याला राज्यसभेची उमेदवारी का मिळाली नाही आणि त्यामागे नक्की काय नाट्य घडले, याचा संपूर्ण खुलासा स्वतः नवनीत राणा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.

…तर नवनीत राणा राज्यसभेवर गेल्या असत्या!

नवनीत राणा यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहून अंतर्गत घडामोडींवरून पडदा उचलला. त्यांनी सांगितले की, “आदरणीय सुनेत्रावहिनी, अजितदादा पवार आणि पार्थ पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी माझ्या कार्यक्षमतेवर विश्वास दाखवला, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मात्र, राज्यसभेची ही उमेदवारी स्वीकारण्यासाठी मला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट’ घालण्यात आली होती, जी मला मान्य नव्हती.”

‘पदासाठी विचारधारा बदलणार नाही’
आपली भाजपप्रती असलेली निष्ठा स्पष्ट करताना राणा पुढे म्हणाल्या, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे लाडके ‘देवाभाऊ’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करणारी भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ती आहे. मी कोणत्याही पदासाठी माझी विचारधारा बदलणार नाही. मी सदैव भाजपचेच काम प्रामाणिकपणे करत राहीन.”
देवेंद्र फडणवीसांनी केला होता मध्यस्थीचा प्रयत्न
राणा यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांना ही राज्यसभेची जागा भाजपसाठी सोडण्याबाबत विनंती केली होती. फडणवीस यांच्या सूचनेवरूनच नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही जागा भाजपला सोडण्याची गळ घातली होती, मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे महायुतीत ते शक्य झाले नाही.
भुजबळांची संधी हुकली; मंत्रिपदाच्या अटीमुळे फिस्कटले गणित?
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नावही या रेसमध्ये आघाडीवर होते. पक्षातील वरिष्ठ नेते भुजबळांना राज्यसभेवर पाठवण्यास अनुकूल होते. मात्र, राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेनुसार, छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी भुजबळांची इच्छा होती. परंतु, भाजप श्रेष्ठींनी या अटीला नकार दिल्यामुळे छगन भुजबळ यांची ही संधी हुकली. भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर अप्रत्यक्षपणे आपली नाराजीही व्यक्त केली आहे.अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादीने आपले जुने आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

