
शिक्षण अर्धवट सोडलं,बेकरीच्या व्यवसायातून सिया-चेतनचं जुळलं सूत, पण त्याच प्रेमानं केतनला संपवलं! लोहगड प्रकरणातील शॉकिंग माहिती
व्यावसायिक असलेल्या केतन अग्रलवाल या तरुणाच्या हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतनचा तोल गेल्याने लोहगडावरून ४०० फूट दरीत कोसळला असल्याचा बनाव आरोपी आणि त्याची होणारी पत्नी सियाने रचला असल्याचे समोर आले. केतन अग्रवालच्या जीवावर उठणारे सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांची ओळख एका व्यवसायाच्या निमित्ताने झाली असल्याचे समोर आले. पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका बाजूला कोट्यवधी रुपयांचे साम्राज्य असलेला बिल्डरपुत्र, उदयपूरमध्ये होणारा शाही विवाह सोहळा आणि इंडोनेशियाच्या बाली बेटावर होणारं प्री-वेडिंग शूट… पण या सगळ्या झगमगाटाच्या मागे एका हत्येचा कट शिजला. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या होणाऱ्या पतीला एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिचे वडील पुण्यात ड्रायफ्रूट्स आणि मसाल्यांचे मोठे व्यापारी आहेत. सियाने बीबीएचे (BBA) शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यानंतर तिने पुण्यात स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू केला होता. याच व्यवसायादरम्यान तिची ओळख चेतन चौधरीशी झाली. चेतनच्या वडिलांचाही ड्रायफ्रूट्सचाच मोठा व्यवसाय होता आणि त्यानेही बीबीएचे शिक्षण अर्धवट सोडले होते.

समान पार्श्वभूमी असलेल्या चेतन आणि सियाची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. दोघांना एकत्र संसार थाटायचा होता, पण दरम्यानच्या काळात सियाच्या घरच्यांनी तिचे लग्न पुण्याच्या नामांकित अग्रवाल कुटुंबातील केतन अग्रवाल याच्याशी निश्चित केले. अमेरिका रिटर्न असलेला केतन एका बड्या रिअल इस्टेट कंपनीत संचालक होता. दोघांचा साखरपुडा झाला आणि नोव्हेंबरमध्ये उदयपूर येथे शाही विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, त्याआधीच केतनचा काटा काढला गेला. दरम्यान, सियाच्या कुटुंबाला तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती होती. मात्र, त्यांना हे मान्य नव्हते. मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर ती चेतनपासून दुरावेल. त्यामुळेच लग्न जमवण्यात आल्याचं म्हटले जाते. पोलिसांच्या तपासात आणखी धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.


