
जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. आजपासून शेतीसाठी दररोज ८ तास वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. याचसोबत, बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई विमानसेवा आगामी २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार असल्याची गूड न्यूजही त्यांनी दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत विविध विकासकामांचा आढावा घेत या घोषणा केल्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; आजपासून ८ तास वीजपुरवठा!

शेतीसाठी वीजपुरवठा वाढविण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सातत्याने केली जात होती. याची गंभीर दखल घेत शासनाने आजपासून जिल्ह्यातील कृषी पंपांना नियमित आठ तास वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी अल निनोच्या परिणामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वीजपुरवठा प्रथम दोन तासांवर आणि नंतर पाच तासांवर मर्यादित करण्यात आला होता. मात्र, आता ८ तास वीज मिळणार असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

२ ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई विमान उड्डाण!
सोलापूरकरांसाठी आणखी एक मोठी घोषणा करताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, २ ऑगस्टपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. या विमानसेवेमुळे सोलापूरमधील उद्योग, व्यापार, शिक्षण आणि वैद्यकीय सेवांसाठी मुंबईला प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचणार असून मोठा फायदा होणार आहे.
जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि घोषणा
शहरातील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा: सोलापूर शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपूल प्रकल्पातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी शासकीय जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
होटगी आयटी पार्कला गती: होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्क (IT Park) प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाची जागा एमआयडीसीकडे (MIDC) विनामोबदला हस्तांतरित करण्यात आली आहे. यामुळे सोलापूरमध्ये आयटी क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
भैय्या चौक रेल्वे पुलाबाबत दोन दिवसांत बैठक: भैय्या चौक येथील रेल्वे पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याबाबत विचारले असता, रेल्वे प्रशासन व संबंधित विभागासोबत पुढील दोन दिवसांत विशेष बैठक घेऊन कामाला गती दिली जाईल, असे आश्वासन गोरे यांनी दिले.
महापालिकेत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: महापालिकेच्या कामकाजाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, “महापालिका ही जनतेची संस्था आहे. विकासकामांमध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ दिला जाणार नाही. शहरात झालेल्या नाला सफाईच्या कामातही कोणतीही गडबड झालेली नाही.”
यंदाची आषाढी वारी ठरली ‘स्वच्छतेची वारी’
यंदाच्या आषाढी वारीत प्रशासनाने सेवाभावाने काम करत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले. वारीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या रोगराईचा प्रसार होऊ नये यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाची वारी ही खऱ्या अर्थाने “स्वच्छतेची वारी” ठरल्याचे पालकमंत्री गोरे यांनी अभिमानाने नमूद केले. तसेच नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यातही कार्यकर्त्यांना सेवा करण्याची संधी मिळाल्यास ती आनंदाने स्वीकारू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दूध भेसळीवर मोठी कारवाई: दरम्यान, जिल्ह्यातील शामगाव येथे अन्न सुरक्षा विभागाने दूध भेसळीविरुद्ध मोठी कारवाई केली असून, भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या दाम्पत्याला अटक करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

