
देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप शांत झालेली नसतानाच, आता महाराष्ट्रात ‘MHT-CET’ परीक्षेमध्येही महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. NEET पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) जंतरमंतरवर ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ केलेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. हा वाद ताजा असतानाच आता महाराष्ट्रातील सीईटी (MHT-CET 2026) परीक्षेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सचिन सावंत यांनी या प्रकरणावर सर्वात आधी भाष्य केल्यानंतर, आमदार रोहित पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महादेव बालगुडे यांनी या आरोपांची राळ उठवली आहे.

महादेव बालगुडे यांनी शेअर केला शिक्षकाचा व्हिडिओ!

राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवरून एका शिक्षकाचा व्हिडिओ शेअर करत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टमध्ये संबंधित शिक्षकाच्या युट्यूब चॅनलची लिंकही देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये MHT-CET 2026 च्या निकालात कसा महाघोटाळा करण्यात आला, याविषयी कथित दावा आणि सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सचिन सावंत यांचा नेमका आरोप काय?
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या परीक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत राज्य सरकारवर मोठा बॉम्ब टाकला आहे. सावंत यांनी थेट गुणांच्या आकडेवारीवरच सवाल उपस्थित केले आहेत. “ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत जेमतेम ३५ ते ४० टक्के गुण मिळाले आहेत, त्यांना MHT-CET परीक्षेत थेट ९० ते १०० पर्सेंटाईल्स कसे काय मिळू शकतात?” असा रोखठोक सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे. या संपूर्ण प्रकरणाची आणि निकालाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सचिन सावंत यांच्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही याच मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे.
NEET नंतर आता CET वरून सरकार कोंडीत?
देशात NEET परीक्षेतील घोटाळ्याविरोधात CJP ने देशभरात रान उठवले होते. त्या आंदोलनामुळे मोदी सरकारला केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता तोच पॅटर्न महाराष्ट्रात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण सीईटी परीक्षेतील कथित घोटाळ्याचे पुरावे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असल्याने विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस-पवार सरकार यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

