
राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या दोन वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. एकीकडे नियमांच्या कडक अंमलबजावणीमुळे राज्यातील लाखो महिलांचा या योजनेचा लाभ बंद झाला असताना, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेगळी माहिती समोर आली आहे. जळगावातील तब्बल दोन हजार महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ घेण्यास नकार दिला आहे.
या २ हजार महिलांनी थेट महिला व बाल कल्याण विभागाकडे लेखी अर्ज सादर करून योजनेचा लाभ नको असल्याचे स्पष्ट केले आहे.

…म्हणून महिलांनी स्वतःहून नाकारली ‘लाडकी बहीण’ योजना!

जळगाव जिल्ह्यातील महिलांनी हा निर्णय एका महत्त्वाच्या तांत्रिक आणि शासकीय धोरणामुळे घेतला आहे. सरकारच्या नियमानुसार, लाभार्थ्यांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. जळगावमधील या महिलांना ‘संजय गांधी निराधार योजना’ या दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ मिळवायचा आहे. दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येणार असल्याच्या धोरणामुळे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी या महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ नाकारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील सुमारे ९२ लाख महिला योजनेतून बाद!
दुसरीकडे, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या नियमांची अत्यंत कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. या कडक नियमांमुळे आणि पडताळणीमुळे राज्यातील सुमारे ९२ लाख लाडक्या बहिणींना विविध कारणांमुळे या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे.
महिला बाद होण्यामागची मुख्य कारणे
बँक खात्याचे किंवा अर्जाचे केवायसी (KYC) पूर्ण न करू शकल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला या योजनेतून बाद झाल्या आहेत.कुटुंबात चारचाकी वाहन (Four Wheeler) असल्याचे चौकशीत समोर आल्याने अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याने नियमात न बसणाऱ्या अनेक महिलांना या योजनेतून कमी करण्यात आले आहे.

