
महाराष्ट्रात एकीकडे अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) भेसळयुक्त अन्नाविरोधात धडक कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. सोलापूरच्या कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे एकाच घरातील दोन लहान चिमुकल्या बहीण-भावाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थोटे कुटुंबातील आयुष आणि गायत्री या दोन्ही लहान मुलांची प्रकृती अचानक बिघडली. प्राथमिक उपचार केल्यानंतर कुटुंब त्यांना पुढील उपचारासाठी सिल्लोडकडे घेऊन जात असताना, रस्त्यातच भराडीजवळ २ वर्षांच्या चिमुकल्या आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यानंतर गंभीर अवस्थेत असलेल्या ७ वर्षांच्या गायत्री हिला छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान तिचीही प्राणज्योत मालवली. अवघ्या काही तासांत दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटना समोर येताच प्रशासनाने तात्काळ सूत्रे हलवली. पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक फरीद सिद्दीकी आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने थेट थोटे यांच्या घरी भेट देऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक टीमने घरातील स्वयंपाकासाठी वापरले जाणारे तांदूळ, मसाले, पीठ आणि हळद-तिखट यांचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले आहेत.

प्राथमिक तपासात मुलांचे वडील नारायण थोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई-वडिलांनी खिचडी खाल्ली होती, मात्र मुलांनी ती खाल्ली नव्हती. फॉरेन्सिक लॅबचे सहाय्यक रासायनिक विश्लेषक आणि आरोग्य यंत्रणांकडून सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मुलांच्या शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच या मृत्यूंमागचे खरे कारण स्पष्ट होईल.

