Latest Marathi News
Ganesh J GIF

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाची उडी? युगेंद्र पवारांनी दिले मोठे संकेत!

बारामती तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळ निवडणुकीत आता मोठी ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष थेट रिंगणात उतरण्याचे स्पष्ट संकेत पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी दिले आहेत.

निंबूत येथील ‘युगवीर गार्डन’ येथे आयोजित शरद पवार गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतांचा आढावा घेतल्यानंतर, पक्ष निवडणूक लढवणार की नाही याचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती युगेंद्र पवार यांनी दिली आहे. त्यामुळे बारामतीच्या ग्रामीण राजकारणात आता राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.

कार्यकर्त्यांची ठाम भूमिका; ‘निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा!’

युगेंद्र पवार यांनी सांगितले की, “ही केवळ एक प्राथमिक बैठक होती आणि कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, मेळाव्यात उपस्थित असलेल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी सोमेश्वर कारखान्याची निवडणूक पक्षाने पूर्ण ताकदीने लढवावी आणि सभासदांसमोर एक सक्षम पर्याय उभा करावा, अशी एकमुखी व ठाम मागणी केली आहे.कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता शरद पवार गट सोमेश्वरच्या आखाड्यात शिट्टी फुंकणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राजकीय हालचालींना वेग

शरद पवार गटाच्या या भूमिकेमुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे. सध्या कारखान्यात असलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गटाने आधीच संपर्क अभियान सुरू करून कारखान्याच्या कामकाजाची माहिती सभासदांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना देखील अंतर्गत बैठका घेऊन संभाव्य उमेदवारांची चाचपणी करत आहेत.अशातच आता शरद पवार गटानेही शड्डू ठोकल्यामुळे सोमेश्वर कारखान्याची ही लढत चौरंगी आणि अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

पुढील आठवड्यात घोषणा; सर्वांचे लक्ष लागून

सर्वसामान्यांचे आणि कारखान्याच्या सभासदांचे हित लक्षात घेऊन पक्ष काय निर्णय घेतो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात युगेंद्र पवार कोणती अधिकृत घोषणा करतात, यावर बारामतीमधील पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!