
राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा पहिला हप्ता अखेर वितरित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल ५ हजार २९ कोटी रुपयांची रक्कम थेट ट्रान्स्फर करण्यात आली आहे.

एका क्लिकवर खाती झाली ‘निल’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतरित केली. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले होते, त्यांच्या खात्यांवर ही लाभाची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांची कर्जखाती पूर्णपणे ‘निल’ (शून्य) झाली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवीन पीक कर्ज देण्याचे बँकांना निर्देश
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना पुन्हा शेतीकामासाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठी राज्य शासनाने सर्व बँकांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नवीन हंगामासाठी मोठे आर्थिक बळ मिळणार आहे.
ज्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे, त्यांचे काय?
पहिल्या यादीत नाव असलेल्या मात्र अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न झालेल्या शेतकऱ्यांनाही घाबरण्याचे कारण नाही. त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच, लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने त्यांच्या कर्जखात्यांवर हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
“अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वीरीत्या मार्गी” – मुख्यमंत्री
अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिली यादी घोषित करून ती सर्व ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली होती. शेतकऱ्यांना कोणताही क्लिष्ट अर्ज न भरता फक्त सोप्या पद्धतीने आधार प्रमाणीकरण करायचे होते. आज ६.२२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार २९ कोटी रुपये जमा झाले आहेत.एनपीए (NPA) खात्यांवर बँकांनी लावलेले थकीत व्याज रद्द केल्यामुळे शासनाने भरलेल्या रक्कमेत ही खाती पूर्णपणे निल झाली आहेत. बँकांकडून त्रुटी असलेले १२ लाख अकाऊंट दुरुस्तीसाठी परत पाठवले असून, आठवडाभरात त्या चुका सुधारून उर्वरित खात्यांमध्येही पैसे वर्ग केले जातील.

