Latest Marathi News
Ganesh J GIF

औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगरनंतर आता ‘बुलढाणा’चे नाव बदलणार?;भाजप आमदार श्वेता महाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

महाराष्ट्रात औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ आणि अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण झाल्यानंतर आता विदर्भातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याची जोरदार मागणी समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ (Rajmata Jijaunagar) करण्यात यावे, अशी मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. याबाबत आमदार महाले यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, मुख्यमंत्र्यांनीही या विनंतीची तत्काळ दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

नामकरणाची मागणी का? आमदारांनी पत्रात काय म्हटले?

आमदार श्वेता महाले यांनी पत्रात बुलढाणा जिल्ह्याचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे राजमाता जिजाऊसाहेबांचे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाला घडवण्यात आणि हिंदवी स्वराज्याची नीव रचण्यात जिजाऊंचे योगदान अतुलनीय आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी शेगाव (संत गजानन महाराज मंदिर), मेहकरचे श्री शारंगधर बालाजी मंदिर, ज्ञानगंगा अभयारण्य आणि सैलानी बाबा दर्गा यांमुळे देशभरातून पर्यटक येथे येतात.अहिल्यानगरच्या धर्तीवर जर बुलढाण्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ झाले, तर जिजाऊसाहेबांचे कार्य जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचेल आणि शिवप्रेमींच्या भावनांचा सन्मान होईल.

मुख्यमंत्र्यांची तत्काळ दखल!

श्वेता महाले यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर करत सांगितले की, राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा सन्मान करण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे.
आमदार श्वेता महाले यांच्या या पत्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, प्रशासनाला यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात बुलढाणा जिल्ह्याच्या नामकरणावर शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!