
सायबर भामट्यांनी आता नागरिकांना गंडा घालण्यासाठी थेट तंत्रज्ञानाचा भयंकर वापर सुरू केला आहे. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाने बनावट व्हिडिओ तयार करून पुण्यातील कात्रज-आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेची तब्बल ४ लाख ९ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तांत्रिक तपास करत आहेत.

असा रचला फसवणुकीचा जाळ!

बनावट व्हिडिओचा वापर: सोशल मीडियावर फिर्यादी महिलेला रतन टाटा यांचा एक कथित व्हिडियो दिसला, ज्यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. व्हिडिओसोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करताच महिलेला एक संशयास्पद ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.यानंतर ‘मधूमोहन’ नावाच्या अज्ञात व्यक्तीने महिलेशी संपर्क साधून चांगल्या परताव्याची भुलथाप दिली.आमिषाला बळी पडून महिलेने टप्प्याटप्प्याने ४,०९,१०० रुपये जमा केले. मात्र, कोणताही परतावा न मिळाल्याने आणि मूळ रक्कमही परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

सायबर पोलिसांचे आवाहन: ‘डीपफेक’ व्हिडिओपासून सावध राहा!
सोशल मीडियावर कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचा व्हिडियो दिसला, तरी त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. सध्या AI तंत्रज्ञानाच्या मदतीने सेलिब्रिटी, राजकीय नेते आणि उद्योगपतींचे बनावट ‘डीपफेक’ व्हिडियो बनवून आर्थिक गंडा घातला जात आहे.
स्मार्ट टिप्स – सायबर सुरक्षेसाठी काय कराल?
अनोळखी लिंकवर क्लिक करू नका: सोशल मीडियावरील कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करून ॲप्स डाउनलोड करू नका.
झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडू नका: शेअर मार्केट किंवा ट्रेडिंगच्या नावाखाली मिळणाऱ्या ‘अवास्तव’ परताव्याच्या जाहिरातींपासून लांब राहा.
तातडीची मदत (1930): दुर्दैवाने फसवणूक झाल्यास वेळ न घालवता तात्काळ आपल्या बँकेला कळवा आणि १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवा.

