
मुंबईतील मध्यवर्ती भाग असलेल्या दादर परिसरात रक्ताच्या नात्याला कलंक फासणारी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ४९ वर्षांच्या मुलाने आपल्या ७९ वर्षीय वयोवृद्ध आईची छातीत चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. दादर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपी मुलाला तात्काळ अटक केली आहे.

‘राम श्याम’ इमारतीत मध्यरात्री थरार

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दादर येथील भवानी शंकर रोडवरील गॅरेज गल्ली परिसरातील ‘राम श्याम’ या इमारतीत घडली.मृत आईचे नाव रेजिना क्रूझ फर्नांडिस (वय ७९) असून आरोपी मुलाचे नाव एडवर्ड क्रूझ फर्नांडिस (वय ४९) आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास माय-लेकामध्ये क्षुल्लक कारणावरून वादावादी सुरू झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर रागाच्या भरात एडवर्डने घरातून चाकू आणला आणि थेट आईच्या छातीत खुपसला. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेजिना यांचा जागीच मृत्यू झाला.

हत्या करण्यामागे ‘नोकरीचा’ वाद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एडवर्ड हा कोणत्याही एका नोकरीत जास्त काळ टिकत नव्हता आणि वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचा. तो काही दिवसांपूर्वीच ओमानवरून भारतात परत आला होता. घरात त्याच्या नोकरीच्या आणि स्थिर स्थावर होण्याच्या मुद्द्यावरून आई आणि मुलामध्ये वारंवार खटके उडत असत. यापूर्वी गेल्या वर्षीही एडवर्डने त्याच्या वृद्ध आईला बेदम मारहाण केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी
घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी मुलगा एडवर्ड याला बेड्या ठोकल्या.आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कौटुंबिक हत्येचा पुढील कसून तपास दादर पोलीस करत आहेत.

