Latest Marathi News
Ganesh J GIF

२ दिवस विहिरीत अंधारात मृत्यूशी झुंज; ७५ वर्षीय आजीला स्थानिक तरुणांमुळे मिळाले जीवनदान

“देव तारी त्याला कोण मारी…” आणि “काळ आला होता पण वेळ आली नव्हती,” या दोन्ही म्हणींचा जिवंत प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील चांदवड शहरात पाहायला मिळाला आहे. एका ७५ वर्षीय वृद्ध आजीबाईंनी तब्बल दोन दिवस अंधाऱ्या विहिरीत पडून मृत्यूशी कडवी झुंज दिली. स्थानिक तरुणांची तत्परता, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वेळेवर झालेल्या मदतीमुळे या आजीला अखेर जीवनदान मिळाले आहे.

नेमकी काय घडली घटना?

चांदवड येथील फुले नगर परिसरात राहणाऱ्या चंद्रभागा धुळाजी व्हरकटे (वय ७५) या आजीबाई २९ ऑगस्ट रोजी आपल्या मुलाकडे जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र, दोन दिवस उलटूनही त्या मुलाच्या घरी पोहोचल्या नाहीत. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली, पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही.

असा लागला आजीचा शोध

गणेश पारवे हा स्थानिक तरुण चांदवडच्या एसटी बस स्थानकाजवळील विहिरीच्या परिसरातून जात असताना त्याला विहिरीतून कुणाचा तरी अस्पष्ट आवाज ऐकू आला. शंका आल्याने गणेशने विहिरीत डोकावून पाहिले असता, त्याला पाण्यातील एका पाईपला बांधलेल्या दोरीला पकडून एक वृद्ध महिला लटकलेली दिसली. गणेशने जराही वेळ न गमावता तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली.

दोन दिवस दोरी पकडून मृत्यूशी झुंज

माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत कौशल्याने विहिरीत उतरून आजींना सुरक्षित बाहेर काढले. सलग दोन दिवस अन्नाचा एक कण आणि पाण्याचा थेंब नसतानाही आजींनी दाखवलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विहिरीतील पाईप आणि दोरीला घट्ट पकडून ठेवल्यामुळेच त्यांचा जीव वाचला.

रुग्णालयात उपचार, प्रकृती ठणठणीत

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर आजींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस पाण्याच्या संपर्कात आणि तणावात राहूनही आजींची प्रकृती सध्या ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, आपण विहिरीकडे का गेलो होतो आणि विहिरीत कसे पडलो, याबद्दल आजींना काहीही आठवत नसल्याचे त्यांनी सांगितले.

कुटुंबीयांनी सोडला सुटकेचा निश्वास

आजी सुरक्षित मिळाल्याची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली आणि सुटकेचा निश्वास सोडला. ७५ व्या वर्षी दाखवलेले धैर्य आणि स्थानिक तरुण गणेश पारवे याने दाखवलेली तत्परता यामुळेच आजींचे प्राण वाचले असून, सध्या चांदवड शहरात या घटनेची आणि आजीच्या धैर्याचीच चर्चा सुरू आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!