Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात यंदा डीजे, लेझर लाईटवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल होणार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडींचा सज्जड इशारा

देशभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजे, ध्वनीक्षेपक (साऊंड सिस्टीम) आणि डोळ्यांना इजा पोहोचवणारे लेझर लाईट यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा थेट इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला आहे.

विद्यानंद बापट यांच्या आग्रहानंतर मोहीम तीव्र

पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत डीजे आणि ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भ देत बापट यांनी ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर आता अनेक पुणेकर एकत्र आले असून, त्यांनी ध्वनीप्रदूषण आणि मिरवणुकीतील वाहतूक कोंडीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे.

लेझरवर पूर्ण बंदी; न्यायालयाच्या नियमांचे पालन बंधनकारक

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी माध्यमांशी बोलताना गणेशोत्सवातील नियमावली स्पष्ट केली.यंदाच्या गणेशोत्सवात पुणे शहरात लेझर लाईटचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असणार आहे.सर्वोच्च न्यायालय आणि हरित लवादाने (NGT) ध्वनीप्रदूषणाबाबत दिलेल्या सर्व आदेशांचे काटेकोर पालन गणेश मंडळांना करावे लागणार आहे. नियमांची पायरमल्ली करणाऱ्यांवर आणि मर्यादेपेक्षा जास्त आवाजात साऊंड सिस्टीम लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले.प्रशासनाकडून सर्व प्रमुख गणेश मंडळांसोबत बैठकांचे सत्र पार पडले असून, त्यांना न्यायालयाच्या नियमांची स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे.

मानवाधिकार आयोगाचे दरवाजे ठोठावले; MPCB ला नोटीस

पुण्यातील डीजेच्या दणदणाटाविरोधात आता न्यायालयीन आणि प्रशासकीय लढा अधिक तीव्र झाला आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील रहिवासी शरद केळकर यांनी पुण्यातील वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात थेट राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीची मानवाधिकार आयोगाने अत्यंत गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (MPCB) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषणावर आळा घालण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!