
‘नीट’ (NEET) परीक्षा गैरव्यवहारानंतर राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या MPSC औषध निरीक्षक (Drug Inspector) पेपरफुटी प्रकरणात पोलीस कारवाईला मोठा वेग आला आहे. मुंबई गुन्हे शाखेने नंदुरबार येथून अटक केलेल्या ऋतुजा पाटील या संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने ऋतुजा पाटीलला ३ दिवसांची, तर इतर आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी लॅपटॉप खाडीत फेकला!

न्यायालयातील सुनावणीदरम्यान पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि MPSC चा अधिकारी विश्वेश्वर नकाते याने गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खाडीत फेकून दिला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याच लॅपटॉपवर नकातेने औषध निरीक्षक परीक्षेतील सर्व २९४ प्रश्न आणि त्यांच्या पर्यायांची नोंद करून ठेवली होती. गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने खाडीत फेकलेला हा लॅपटॉप शोधून काढला असून, त्यातील डेटा रिकव्हर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

आर्थिक व्यवहारांचे दस्तावेज जप्त; कोर्टात पोलिसांचा युक्तिवाद
नंदुरबार येथील ‘कौटिल्या क्लासेस’चा संचालक आणि आरोपी प्रवीण पाटील याच्या घरावर मारलेल्या छाप्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचे दस्तावेज सापडले आहेत.न्यायालयात आरोपींच्या ७ दिवसांच्या कोठडीची मागणी करताना पोलिसांनी स्पष्ट केले की, तपास अत्यंत प्रगतीपथावर असून, अटक करण्यात आलेली ऋतुजा पाटील आणि मुख्य आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करणे गरजेचे आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
ऋतुजा पाटील कोर्टात भावुक; वकिलांचा युक्तिवाद
आज न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपी ऋतुजा पाटील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तिच्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की,ऋतुजाने गौरव नावाच्या व्यक्तीला प्रश्नसंच पाठवला होता. हा प्रश्नसंच २० तारखेला मिळाला होता, मात्र तो MPSC चाच अधिकृत प्रश्नसंच आहे, याची कोणतीही कल्पना ऋतुजाला नव्हती.दुसऱ्या बाजूला आरोपींचे वकील सत्यराम गौड यांनी सांगितले की, “कोणता प्रश्न परीक्षेत येणार आहे, हे कोणालाच माहिती नव्हते. विश्वेश्वर नकाते यांचा लॅपटॉप नष्ट झाला होता. पोलिसांनी ७ दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.”
आतापर्यंत ८ जणांना अटक
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी गुन्हे शाखेने यापूर्वीच ३ अधिकाऱ्यांसह ७ जणांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर नंदुरबारमधून ऋतुजा पाटीलला ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्यामुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता ८ वर पोहोचली आहे. या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

