
पुण्यातील कोथरूड परिसरात विकासकामांवरून मंत्र्यांना प्रश्न विचारून चर्चेत आलेले प्रसिद्ध युट्युबर संतोष पंडित यांना मध्यरात्री १ वाजता राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरून आक्षेपार्ह आणि अश्लील शेरेबाजी केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, या कारवाईमुळे पुण्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पंडित यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मिताली साळवेकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले होते. या व्हिडिओमध्ये शिवराळ आणि अवमानकारक भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत मध्यरात्री १ वाजता पंडित यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल माने करत आहेत.

विकासकामांवरील व्हिडिओंमुळे होते प्रसिद्ध
संतोष पंडित हे सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या (PMC) विकासकामांवर, रस्ते व पायाभूत सुविधांमधील त्रुटींवर भाष्य करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. प्रशासकीय कारभारावर प्रश्न उपस्थित करणारे त्यांचे व्हिडिओ नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहिले जातात. मात्र, नुकत्याच पोस्ट केलेल्या काही व्हिडिओंमधील आक्षेपार्ह भाषेमुळे त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
दोन दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांच्याबाबत अश्लील भाषेतील व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींविरोधात सोशल मीडियावर अवमानकारक किंवा आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी आधीच दिला होता.अशातच संतोष पंडित यांच्यावर थेट अटकेची कारवाई झाल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

