
‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेअंतर्गत राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये मिळणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता शिक्षण विभागाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. शालेय पोषण आहारातील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी इशारा दिल्यानंतर, शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांसाठी एक नवी कडक नियमावली जाहीर केली आहे.

पोषण आहारात अनियमितता आढळल्यास कारवाई

राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना दररोज ४५० कॅलरीज व १२ ग्रॅम प्रथिने, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० कॅलरीज व २० ग्रॅम प्रथिने असलेला आहार दिला जातो. केंद्र सरकारच्या अन्न महामंडळाकडून सवलतीच्या दरात तांदूळ पुरवला जात असतानाही अनेक शाळांमध्ये आहाराची गुणवत्ता राखली जात नसल्याचे प्रकार समोर आले होते. यावर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कडक भूमिका घेत, “शाळांमध्ये अन्न शिजवत असाल तर परवाना घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा,” असा थेट इशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने ही सविस्तर नियमावली लागू केली आहे.

अशी आहे शिक्षण विभागाची नवी नियमावली
पालकांकडून अन्नाची चव: विद्यार्थ्यांना आहार देण्यापूर्वी दररोज पालकांना शाळेत बोलावून अन्नाची चव चाखायला द्यावी लागेल आणि त्यांच्या प्रतिक्रिया एका विशेष रजिस्टरमध्ये नोंदवाव्या लागतील.
स्वच्छतेचे कडक नियम: स्वयंपाकगृह, भांडी आणि पिण्याच्या पाण्याची टाकी पूर्णपणे स्वच्छ असणे बंधनकारक आहे.
अॅप्रन आणि टोपी अनिवार्य: अन्न शिजवणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीसांनी काम करताना अॅप्रन व टोपी घालणे तसेच स्वच्छता राखणे बंधनकारक करण्यात आले आहे.
स्वच्छ ठिकाणीच भोजन: विद्यार्थ्यांना धुळीत किंवा मैदानात बसवून आहार न देता व्हरांड्यात किंवा इतर स्वच्छ ठिकाणी बसवून जेवण द्यावे.
धान्याची तपासणी: पुरवठादाराकडून आलेला तांदूळ आणि इतर धान्याचा दर्जा शाळा प्रशासनाने आधी तपासून घ्यावा.
भरारी पथकांची नजर: या सर्व नियमांचे काटेकोर पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी भरारी पथके शाळांना अचानक भेटी देऊन आहाराच्या गुणवत्तेची तपासणी करतील.
डिजिटल नोंद: आहार घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नोंद ‘MDM’ (Mid Day Meal) पोर्टलवर करणे सक्तीचे असणार आहे.
या नव्या नियमांमुळे राज्यातील सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार पोषण आहार मिळण्यास मदत होणार आहे.

