Latest Marathi News
Ganesh J GIF

अमरावतीत भरदिवसा थरार; एकतर्फी प्रेमातून १७ वर्षीय तरुणीची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या

स्थानिक रवी नगर चौकात गुरुवारी दुपारी पावणेएकच्या (१२.४५) सुमारास एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. एकतर्फी प्रेमाच्या विकृत मानसिकतेतून आणि ब्रेकअपच्या संतापातून एका माथेफिरू तरुणाने शर्वरी नामक महाविद्यालयीन विद्यार्थीनेवर चाकूने सपासप वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. गजबजलेल्या चौकात घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरातील नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत.

ब्रेकअपच्या संतापातून हत्याकांड

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून शर्वरीशी संबंध असल्याचा संशय आहे. मात्र, अलीकडेच तिने त्याच्याशी संबंध तोडले होते (ब्रेकअप केले होते). याच गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून आरोपी तिच्यावर लक्ष ठेवून होता. गुरुवारी दुपारी शर्वरी आपल्या दुचाकीने ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात जात असताना, मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या आरोपीने तिचा पाठलाग केला. रवी नगर चौकात आरोपीने तिला गाठून वाद घातला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि नराधम आरोपीने शर्वरीच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर चाकूने सपासप वार केले.

प्राण वाचवण्यासाठी तरुणीचा निकराचा लढा

हल्ल्यादरम्यान शर्वरीने जिवाच्या आकांताने आरोपीशी झटापट करत प्राण वाचवण्यासाठी निकराचा प्रतिकार केला. या झटापटीत आरोपीचा मोबाईल आणि पाकीट घटनास्थळीच गळून पडले. मात्र, निर्दयी हल्लेखोराने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

उपचारापूर्वीच मृत्यू; पोलिसांची पथके रवाना

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्याम घुगे, राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण, गुन्हे शाखाप्रमुख अतुल वर आणि दिनेश दहातोंडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला तातडीने बडनेरा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या भीषण घटनेमुळे शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनास्थळी सापडलेला मोबाईल आणि पाकिटाच्या आधारे राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी रवाना झाली आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!