Latest Marathi News
Ganesh J GIF

ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून आईने तीन चिमुकल्यांसह मारली उडी; आई अन् मुलाचा जागीच मृत्यू, दोन मुली गंभीर

खवड्या डोंगरावरून उडी घेतल्याची घटना ताजी असतानाच, धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून एका महिलेने आपल्या तीन लहान मुलांसह उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आईसह एका चिमुकल्या मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

किल्ल्याच्या उंच तटबंदीवरून अचानक मारली उडी

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील वंताळा येथील रहिवासी असलेल्या अश्विनी तानाजी मोहिते (वय ३०) या गुरुवारी आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी अचानक उंच तटबंदीवरून तिन्ही मुलांना सोबत घेऊन खाली उडी घेतली.
उंच भागावरून खाली पडल्याने मोठा आवाज झाला. तेथील प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे आई अश्विनी मोहिते आणि त्यांच्या एका मुलाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता.

दोन चिमुकल्या मुलींची प्रकृती चिंताजनक

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन चिमुकल्या मुलींना नागरिकांच्या मदतीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, दोन्ही मुलींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने धाराशिव येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात (जीजीएच) हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वंताळा गावावर पसरली शोककळा

एकाच कुटुंबातील चौघांवर कोसळलेल्या या भीषण प्रसंगामुळे वंताळा गावावर आणि संपूर्ण धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. संबंधित महिलेने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? यामागे कौटुंबिक कलह होता की अन्य काही मानसिक ताणतणाव, याचा शोध पोलीस घेत आहेत. नळदुर्ग पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!